Join us

सिंगापूर प्रत्येक नागरिकास देणार बोनस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 3:10 AM

सिंगापूर सरकारने अर्थसंकल्पातील शिलकी रकमेतून देशातील २१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येकाला ‘बोनस’ देण्याची घोषणा केली आहे

सिंगापूर : सिंगापूर सरकारने अर्थसंकल्पातील शिलकी रकमेतून देशातील २१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येकाला ‘बोनस’ देण्याची घोषणा केली आहे. नागरिकांना त्यांच्या करपात्र उत्पन्नानुसार १०० ते ३०० सिंगापूर डॉलर (४९00 रुपये ते १४ हजार ७00 रुपये) एवढी रक्कम बोनस म्हणून मिळेल.वित्तमंत्री हेंग स्वी किएत यांनी १० अब्ज सिंगापुरी डॉलर शिलकीचा अर्थसंकल्प मांडताना सुमारे ७०० दशलक्ष सिंगापुरी डॉलर नागरिकांना ‘बोनस’ म्हणून वाटण्याची घोषणा केली. सुमारे २७ लाख नागरिकांना तो मिळेल. चालू वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी त्याचे वाटप होईल. या बोनसचे वर्णन मंडारियन भाषेत ‘हाँगबाओ’ असे केले आहे. याचा अर्थ विशेष आनंदाप्रसंगी दिली जाणारी रोख बक्षीस रक्कम. सिंगापूरच्या आर्थिक प्रगतीत प्रत्येक नागरिकास सहभागी करून घेण्याची सरकारची प्रतिबद्धता यातून दिसून येते, असे हेंग म्हणाले. (वृत्तसंस्था)