मुंबई, दि. 9 - देशातील श्रीमंत कुटुंबांच्या यादीत समाविष्ट असणा-या सिंघानिया कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. यावेळी हा वाद विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात सुरु आहे. रेमंड लिमिटेडचं साम्राज्य उभे करणारे विजयपत सिंघानिया यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलाने त्यांना रस्त्यावर आणलं असून, दारोदारी भटकण्याची वेळ आणली आहे. रेमंड लिमिटेड आपली खासगी कंपनी असल्यासारखं गौतम सिंघानिया वागत असल्याचा आरोप विजयपत सिंघानिया यांनी केला आहे.
भारतामधील प्रसिद्ध ब्रॅण्ड्समध्ये सामील असलेल्या रेमंड लिमिटेडला आपला मुलगा गौतम सिंघानियाच्या हाती सोपवल्यानंतर विजयपत सिंघानिया स्वत: मुंबईतील ग्रॅण्ड पराडी सोसायटीत एका भाड्याच्या घरात राहत आहेत.
विजयपत सिंघानिया यांनी ‘रेमंड लिमिटेड’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या गौतम सिंघानिया यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये मुंबईतील मलबार हिलमधील जे के हाऊस या 36 मजली इमारतीतील ड्युप्लेक्स फ्लॅटचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी वारंवार गौतम सिंघानिया यांना आठवण करुन देण्यात आलं, मात्र त्याचा फायदा झाला नाही असंही याचिकेत सांगण्यात आलं आहे.
बुधवारी झालेल्या सुनावणीत विजयपत सिंघानिया यांना कशाप्रकारे आर्थिक समस्यांना सामोरं जाव लागत आहे याची माहिती वकिलाने दिली. विजयपत सिंघानिया यांनी कंपनीचे सारे शेअर्स आपल्या मुलाच्या नावे केले होते, ज्याची किंमत 1000 कोटींच्या आसपास होती. मात्र गौतम सिंघानिया यांनी यानंतरही वडिलांना वा-यावर सोडलं. इतकंच नाही तर त्यांची गाडी आणि ड्रायव्हरही काढून घेतलं अशी माहिती वकिलाने दिली आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार गौतम सिंघानिया आणि त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांच्यात मुंबईतील फ्लॅटवरुन वाद सुरु आहे. विजयपत सिंघानिया यांनी गौतम सिंघानियांविरोधात कायदेशीर लढा सुरु केला असून मुंबई उच्च न्यायालयात दरवाजा ठोठावला आहे.
गौतम सिंघानिया हे रेमंड लिमिटेड कंपनी फक्त स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे वागतात, असा आरोपही विजयपत यांनी याचिकेत करण्यात आला आहे. इमारतीच्या पुनर्विकासासाठी करण्यात आलेल्या करारानुसार, जे. के. हाऊसमधील 5 हजार स्क्वेअर फुटांचा प्लॅट विजयपत सिंघानियांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र गौतम सिंघानियांमुळे तो त्यांना मिळाला नाही, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली गेली आहे.
विजयपत यांनी गौतम सिंघानिया यांच्यावर चुकीच्या वर्तवणुकीचा आरोपही केला आहे. विजयपथ यांनी न्यायालयाला सांगितलं आहे की, 'रेमंडचे दोन कर्मचारी जितेंद्र अग्रवाल आणि आर के गनेरीवाला यांनी गौतम सिंघानिया यांच्या सांगण्यावरुन महत्वाची कागदपत्रं गायब केली आहेत. त्यामुळे आता आपल्याकडे कोणताच पुरावा नाही आहे'.
न्यायालयापर्यंत पोहोचलेला हा वाद भविष्यात कुठपर्यंत जातो हे पाहावं लागेल. दरम्यान या वादावर सिंघानिया पिता-पुत्रांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.