Join us

यापुढे कोणत्याच वस्तूंवर 28% जीएसटी नसेल- जेटली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 3:35 PM

जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल होणार 

नवी दिल्ली: लवकरच सर्व वस्तूंवर समान कर आकारला जाईल, असे संकेत अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिलेत. याशिवाय जीएसटीमधील 28 टक्क्यांचा टप्पा लवकरच काढून टाकण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. सध्या जीएसटीचे चार टप्पे आहेत. यातील 12 आणि 18 टक्के या टप्प्यांमध्ये सुवर्णमध्य काढला जाईल, असं अर्थमंत्र्यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. 'सध्या देशात चार टप्प्यांमध्ये जीएसटी आकारला जातो. 5%, 12%, 18% आणि 28% अशा चार टप्प्यांमध्ये जीएसटीची आकारणी होते. यापैकी 12% आणि 18% यांच्यात सुवर्णमध्य साधला जाईल,' अशी माहिती जेटलींनी ब्लॉगमधून दिली. मात्र हा सुवर्णमध्य जीएसटीमधून मिळणारं उत्पन्न वाढवल्यावरच काढला जाईल, अशी पुस्तीदेखील त्यांनी जोडली. 'लवकरच देशात जीएसटी फक्त तीन टप्प्यांमध्ये आकारला जाईल. शून्य, 5% आणि उच्च प्रतीच्या वस्तूंसाठी आणखी एक टप्पा, अशा तीन टप्प्यांमध्ये जीएसटी आकारण्यात येईल,' असं जेटलींनी ब्लॉगमध्ये नमूद केलं. सध्या जीएसटीतील सर्वात मोठा टप्पा 28 टक्क्यांचा आहे. हा टप्पा लवकरच हटवण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले. नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत 28 टक्क्यांच्या टप्प्यातून 23 वस्तू वगळण्यात आल्या. त्यामुळे आता फक्त 28 वस्तूंवरच 28 टक्के जीएसटी आहे. आलिशान गाड्या, एसी, मोठे टीव्ही, डीश वॉशर यासारख्या 28 वस्तूंवरील कर 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे. आता लवकरच सिमेंटवरील कर कमी करण्यात येऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, अशी माहिती जेटलींनी दिली. 

टॅग्स :जीएसटीअरूण जेटली