Mutual Fund : शेअर मार्केटमधील जोखीम कमी करुन मोठा फंड तयार करायचा असेल तर म्युच्युअल फंड सही है बॉस. एसआयपीद्वारे नियमित गुंतवणूक केल्याने आर्थिक शिस्त लागण्यासोबत गुंतवणूकदारांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होण्यास मदत होते. म्युच्युअल फंड हाऊसेस गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सतत नवीन थीम आणि योजना सुरू करतात. यापैकी एक योजना फ्लेक्सी कॅप फंड आहे, जी गुंतवणूकदारांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.
हे फंड वेगवेगळ्या मार्केट कॅप, उद्योग आणि क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे कोणत्याही एका क्षेत्रातील खराब कामगिरीचा प्रभाव कमी होतो. अलीकडच्या काळात फ्लेक्सी कॅप फंडांनी चमकदार कामगिरी केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच फंडाबद्दल सांगणार आहोत. ज्याने ११ वर्षात बंपर रिटर्न्स दिले आहेत.
या एका फंडाने केला चमत्कार
पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड त्याच्या मालमत्तेपैकी किमान ६५% इक्विटी शेअर्समध्ये गुंतवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. २ ऑक्टोबरपर्यंत या फंडाची एकूण मालमत्ता व्यवस्थापनाखालील (AUM) रुपये ७८,४९० कोटी आहे. या फंडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ. फंडाची टॉप गुंतवणुकीत HDFC बँक (७.९८%), पॉवर ग्रिड (६.७४%), बजाज होल्डिंग्स (६.६४%) यांचा समावेश आहे. याशिवाय, आयटीसी ५.६५% आणि कोल इंडिया ५.५९% शेअर्सचा समावेश आहे. या फंडाने गुंतवणूक केलेल्या सर्व कंपन्या आज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. याचा गुंतवणूकदारांनाही फायदा होत आहे.
पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड
या फंडाने ११ वर्षे आणि ४ महिन्यांच्या कालावधित एकूण २०.३३% परतावा दिला आहे. इतक्या मोठ्या कालावधीत कुठल्याही फंडाने केलेली ही उत्कृष्ट कामगिरी आहे. त्यामुळे तो एक आकर्षक गुंतवणूक पर्याय बनला आहे. विविध कालमर्यादेतही फंडाने चांगला परतावा दिला आहे. फंडाने गेल्या एका वर्षात ३९.६५%, तीन वर्षांत १८.४३%, पाच वर्षांत २६.४०%, सात वर्षांत २०.६०% आणि दहा वर्षांत १८.६८% परतावा मिळवला आहे.
फंडाची कामगिरी त्याच्या दीर्घकालीन गुंतवणूकीचा दृष्टिकोन आणि मजबूत पोर्टफोलिओ प्लॅनिंग दर्शवते. हा फंड गुंतवणूकदारांना स्थिरता तसेच उच्च परतावा देत आहे. ज्यामुळे इतर फ्लेक्सी कॅप फंडांच्या तुलनेत हा एक चांगला पर्याय आहे.
एसआयपी योजना
पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा दिला आहे. ११ वर्षांसाठी दर महिन्याला १०,००० रुपयांची SIP केली असती तर एकूण गुंतवणूक १३,३०,००० रुपये झाली असती, जी आज ४५,८१,८३४ रुपये (अंदाजे ४६ लाख) झाली असती. हा फंड वार्षिक २०.९ टक्के परतावा देत आहे.
(Disclaimer : यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)