नवी दिल्ली : २00८ साली जगात वित्तीय संकट निर्माण झाले होते. अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स ही मोठी वित्तीय सेवा संस्था तेव्हा दिवाळखोरीत निघाली होती. त्याचे दूरगामी परिणाम अमेरिकी अर्थव्यवस्थेवर झाले. भारतातील बँकिंग क्षेत्रात सध्या असेच संकट घोंघावत असून मिनी-लेहमन आवृत्ती दिसून येत आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
मानक संस्थांनी याबाबत आधीच इशारा दिला आहे. भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. (आयएलअँडएफएस) समूह आणि त्याच्या सहयोगी संस्था सध्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यांनी २00८ मधील संकटाची जाणीव करून दिली आहे. सूत्रांनी सांगितले की, ‘आयएलअँडएफएस’ समूहाकडे कर्जाच्या परतफेडीसाठी पैसेच नाहीत. कंपनीला ५00 दशलक्ष डॉलरचे कर्ज हप्ते देणे असताना कंपनीकडे उपलब्ध अवघा २७ दशलक्ष डॉलर इतका निधी आहे. गेल्या महिन्यातील कर्जाचे काही हप्ते कंपनी देऊ शकलेली नाही.
‘आयएलअँडएफएस’वर बँका आणि म्युच्युअल फंड कंपन्यांचे तब्बल १२.५ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. ‘आयएलअँडएफएस’ समूहाचे संस्थापक रवी पार्थसारथी हे प्रकृतीच्या कारणांवरून जुलैमध्ये पदावरून पायउतार झाले. उरलेले संचालक मंडळ केवळ शोभेचे बाहुले बनून राहिले आहे. ही कंपनी कोसळल्यास २00८ मध्ये अमेरिकेत जो हाहाकार उडाला होता, तो भारतात दिसून येईल, असे जाणकारांचे मत आहे.
ऊर्जा प्रकल्पही अडचणीत
‘आयएलअँडएफएस’ ही कंपनी रस्ते, बोगदे, जल प्रक्रिया प्रकल्प आणि वीज प्रकल्पांना गेल्या ३0 वर्षांपासून अर्थसाह्य करते. कर्ज फेडण्यासाठी यापैकी कोणतीही मालमत्ता कंपनी विकू शकत नाही.
कंपनीचे ऊर्जा प्रकल्प इंधन आणि खरेदी कराराअभावी अडकले आहेत. रस्ते प्रकल्प पर्यावरण मंजुऱ्यांतून कसेबसे बाहेर काढले गेले, परंतु टोल वसुली पुरेशी नसल्यामुळे नवे संकट निर्माण झाले आहे. महामार्ग प्राधिकरणासोबतच्या वादामुळे काही प्रकल्प रखडले आहेत.
देशात आर्थिक मंदीच्या संकटाची स्थिती!
अर्थतज्ज्ञांचे मत: अर्थसाह्य करणारा समूह कर्जाच्या ओझ्याखाली; फेडीसाठी पैसेच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:55 AM2018-09-14T00:55:36+5:302018-09-14T06:35:26+5:30