Join us

सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्रात सुधारणा; वाढीचा सलग पाचवा महिना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 1:48 AM

पीएमआय पोहोचला ५०च्या जवळ

नवी दिल्ली : कोविड-१९ निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये भारतीय सेवा क्षेत्रात चांगली सुधारणा दिसून आली असून, सेवा क्षेत्र व्यावसायिक घडामोडी निर्देशांक (पीएमआय) वाढून ४९.८ अंकांवर गेला आहे. आॅगस्टमध्ये तो ४१.८ अंकांवर होता. पीएमआयमध्ये झालेली ही सलग पाचव्या महिन्यातील वाढ आहे.५० अंकांवरील पीएमआय वृद्धी, तर त्याखालील पीएमआय घसरण दर्शवितो. सप्टेंबरमध्ये पीएमआय वाढला असला तरी रोजगारात मात्र सलग सातव्या महिन्यात घसरण झाली आहे. नवीन व्यवसायात अल्प प्रमाणात घसरण झाली असली तरी मार्चनंतरची ही सर्वांत कमी घसरण आहे. सर्वसाधारण महागाईचा दर मात्र आॅगस्टसारखाच असताना उत्पादन खर्च मात्र अधिक गतीने वाढला आहे.आयएचएस मार्किटच्या आर्थिक सहायक संचालक पॉलियाना डे लिमा यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे सेवा क्षेत्राला फायदा झाला आहे.डे लिमा यांनी सांगितले की, अनुशेष आकडेवारीवरून असे दिसते की, नजीकच्या काळात नव्या कामगार भरतीचे प्रयत्न सुरूच राहतील. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांत आपल्याला चांगला रोजगार कल दिसून येऊ शकतो. लोकांनी नोकरीच्या शोधार्थ आपली मूळ गावे सोडल्यास रोजगारांत चांगली वाढ दिसून येऊ शकेल. कोविड-१९वर लवकरात लवकर लस उपलब्ध होईल, अशी सेवा क्षेत्रातील कंपन्यांना आशा आहे. त्यानुसार, चांगल्या व्यवसाय वृद्धीचा अंदाज त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.भरतीमध्ये अडथळेदेशभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार कामगार उपलब्ध नसल्यामुळे अधिकची कामगार भरती करण्याच्या प्रयत्नांत अडथळे येत आहेत, असे सहभागी व्यावसायिकांनी सांगितले. अनेक ठिकाणी अद्यापही घरूनच काम करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.