मुंबई : शेअर बाजारांत गेल्या सहा व्यावसायिक सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीचा सिलसिला मंगळवारी थांबला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१ अंकांनी वाढला. ब्ल्यूचीप कंपन्यांत झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्सला बळ मिळाले. निर्देशांक वर चढला असला तरी कमजोर तिमाही निकालांमुळे बाजारातील भीती मात्र कायम असल्याचे चित्र दिवसभर पाहावयास मिळाले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २६,६६0.७१ अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढून २६,७३२.२४ अंकांवर गेला. त्यानंतर बाजारात नफा वसुलीला ऊत आला. त्यामुळे निर्देशांक खाली आला. सत्राच्या अखेरीस त्याने पुन्हा उसळी मारली. २६,५९0.५९ अंकांवर तो बंद झाला. ३१.४४ अंकांची अथवा 0.१२ टक्क्याची वाढ त्याने नोंदविली. गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्सने ९११.६६ अंक गमावले होते. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अल्प प्रमाणात म्हणजेच ९.९0 अंकांनी अथवा 0.१२ टक्क्याने वाढून ८,0६0.७0 अंकांवर बंद झाला. त्याआधी निफ्टीने ८,१00 अंकांचा टप्पा ओलांडला होता. तथापि, ही पातळी कायम राखण्यात त्याला अपयश आले. एनटीपीसीचा समभाग सर्वाधिक २.१५ टक्क्यांनी वाढला. त्यापाठोपाठ एम अँड एम, ओएनजीसी आणि हिंदाल्को यांचे समभाग वाढले. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी १४ कंपन्यांचे समभाग वाढले. क्षेत्रनिहाय विचार करता आयटीचा निर्देशांक सर्वाधिक 0.९१ टक्क्याने वाढला. त्याखालोखाल आॅईल अँड गॅस, पीएसयू, पॉवर आणि हेल्थकेअर हे निर्देशांक वाढले. व्यापक बाजारांतही तेजी दिसून आली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक 0.३९ टक्क्यापर्यंत वर चढले. हाँगकाँग आणि सिंगापूर या बाजारांसह बहुतांश आशियाई बाजारांत तेजीचे वातावरण राहिले. चीनचा शांघाय कंपोजिट मात्र 0.२५ टक्क्याने घसरला. युरोपीय बाजारांत सकाळी तेजीचा कल दिसून आला. (वृत्तसंस्था)
सहा दिवसांच्या घसरणीला ब्रेक
By admin | Published: November 04, 2015 4:24 AM