Join us

सहा आठवड्यांच्या वाढीला डॉलरमुळे लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 1:13 AM

जगभरातील शेअर बाजारांमधील मंदीचे वातावरण आणि परकीय वित्तसंस्थांकडून झालेली विक्री, यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक खाली आले.

-प्रसाद गो. जोशीडॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठलेला नवीन नीचांक, देशातील पेट्रोल व डिझेलचे सातत्याने वाढत असलेले दर, महागाईचे बसू लागलेले चटके, पावसाने काहीसे वटारलेले डोळे या जोडीलाच जगभरातील शेअर बाजारांमधील मंदीचे वातावरण आणि परकीय वित्तसंस्थांकडून झालेली विक्री, यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक खाली आले. गेले सहा सप्ताह सातत्याने वाढत असलेल्या निर्देशांकाला यामुळे ब्रेक लागला.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला असला, तरी नंतर मात्र घसरण बघावयास मिळाली. सप्ताहात संवेदनशील निर्देशांकाने ३८९३४.३५ ते ३७७७४.४२ अंशांदरम्यान हेलकावे घेतले. सप्ताहाच्या अखेरीस तो ३८३८९.८२ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यात २५५.२५ अंशांनी म्हणजेच ०.६६ टक्क्यांनी घट झाली. या आधीच्या सहा सप्ताहांमध्ये निर्देशांक २३७३.९७ अंश म्हणजेच ६.५० टक्क्यांनी वाढला होता.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ९१.४० अंशांनी घसरून ११५८९.१० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांकही घसरले. मिडकॅप १६५०४.८६ (-३७६.४७) अंशांवर तर स्मॉलकॅप १६८९६.९५ (-१९९.०१) अंशांवर बंद झाले.डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण हा बाजाराच्या काळजीचा मुद्दा आहे. गतसप्ताहात रुपयाने ७२ च्याही खाली डुबकी घेतली. यामुळे देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढून त्याचा फटका अर्थव्यवस्थेच्या वाढीला बसणार आहे. आंतरराष्टÑीय बाजारात व देशांतर्गतही पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. यामुळे चलनवाढीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळेच सर्वत्र चिंतेचे वातावरण असून, बाजारात विक्रीचा जोर वाढलेला दिसून आला.आॅगस्टअखेर देशातील पाऊस सरासरीच्या ९४ टक्केच झाला असून, आगामी काळत ही तूट भरून निघणार का ही चिंता आहे. परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये बाजारातून ५६ अब्ज रुपये काढून घेतले.

टॅग्स :निर्देशांक