मुंबई : देशातील लोकसंख्येत ५४ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा हा तरुणांचा असून आगामी काळात अर्थकारणाला गती देण्यासाठी विविध कौशल्य उपक्रमांचे शिक्षण देणे अनिवार्य असल्याचे मत व्यक्त करतानाच देशातील प्रत्येक जिल्ह्यात लवकरच कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात असल्याची घोषणा केंद्रीय नगर विकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी दिली. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयातर्फे येथे आयोजित राष्ट्रीय कौशल्य परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.देशात कौशल्य विकासाचा प्रसार करण्यासाठी देशातील सर्व जिल्हे आणि ५४५ लोकसभा मतदार संघात प्रत्येकी एका कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या निमित्ताने कौशल्य विकासाशी निगडीत अनेक मुद्यांवर वैंकय्या नायडू यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, जपान, दक्षिण कोरिया, युरोपातील देश अशा काही विकसित देशांतील कौशल्य विकासाचे प्रमाण हे ७० ते ९० टक्के इतके आहे. परंतु, भारतात हे प्रमाण अवघे ५.३ टक्के आहे. त्यामुळेच यावर भर देण्याची नितांत गरज आहे.या परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, ग्रामविकास मंत्री बिरेन्द्रसिंह चौधरी, कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी, पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेन्द्र प्रधान तसेच, उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. सकाळच्या सत्रात अनेक उद्योजकांनी कौशल्य विकास यामुद्याच्या अनुषंगाने काही सादरीकरणही केले. (प्रतिनिधी)सध्या काही संस्था वा खाजगी कंपन्यातर्फे विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु, तेथील प्रमाणपत्र उद्योगात सर्वत्र ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळेच राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रातर्फे प्रशिक्षित करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल व प्रमाणपत्रही दिले जाईल.सरकारतर्फे हे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्यामुळे याचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी अथवा स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी होईल. महाराष्ट्रात असलेल्या अॅप्रेन्टिसशीप कायद्याचे कौतुक करतानाच, या कायद्याचा अवलंब अन्य राज्यात करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार कौशल्य विकास केंद्र
By admin | Published: January 13, 2016 3:19 AM