जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असा लौकिक असलेले टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क हे भारत दौऱ्यावर येणार असल्याने या दौऱ्याबाबत खूप उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र हा दौरा लांबणीवर पडल्याने भारतातील उद्योगजगताची निराशा झाली होती. मात्र याचदरम्यान भारताला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारतभेट टाळणारे टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी अचानक चीनचा दौरा करून चिनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. मस्क यांच्या टेस्लाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत या चीन दौऱ्यामध्ये काही महत्त्वाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अचानक चीनच्या दौऱ्यावर गेलेले मस्क हे चीनमध्ये टेस्लाबाबत काही महत्त्वाची नवी योजना तयार करून घेऊन गेल्याची चर्चा आहे. चीन दौऱ्यामध्ये ते फूल सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरच्या रोलआऊट आणि डेटा ट्रान्सफरबाबत चर्चा करणार आहेत. डेटा ट्रान्सफरच्या माध्यमातून ते टेस्लाच्या एफएसडी अल्गोरिदमला ट्रेन करतील. तसेच त्याला अधिक चांगला बनवण्यासाठी काम करतील.
या भेटीबाबत रॉयटर्सने चिनी प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने सांगितले की, एलॉन मस्क यांनी बीजिंगमध्ये चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीमध्ये ली कियांग यांनी मस्क यांना सांगितले की, चीनमध्ये टेस्लाच्या विकासाला अमेरिका-चीनमधील आर्थिक आणि व्यापारी सहकार्याचं यशस्वी उदाहरण मानता येईल. दरम्यान, चिनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एस्कवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी या भेटीबाबत आनंद व्यक्त केला. तसेच चिनी पंतप्रधानांसोबतचा एक फोटोही शेअर केला.
एलॉन मस्क हे भारत दौऱ्यावर येणार होते. त्यासाठी त्यांनी २२ एप्रिल ही तारीख निश्चित केली होती. मात्र नंतर त्यांनी भारत दौऱ्यावर येणं टाळलं. तसेच भारताचा शेजारी आणि प्रतिस्पर्धी देश असलेल्या चीनच्या दिशेने आपली पावलं वळवली.