Join us

एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:39 PM

Sky Gold Share Price : जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाशी संबंधित या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३६०६.०५ रुपयांवर पोहोचला.

Sky Gold Share Price : जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाशी संबंधित स्काय गोल्ड (Sky Gold) या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी स्काय गोल्डचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३६०६.०५ रुपयांवर पोहोचला. एका मोठ्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी दिसून आली. स्काय गोल्ड आपल्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देत आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं एका शेअरवर ९ या प्रमाणात बोनस समभाग देण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक शेअरवर ९ बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही.

दुसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार

स्काय गोल्ड आपल्या भागधारकांना अलीकडच्या वर्षांत दुसऱ्यांदा बोनस शेअर्स देत आहे. कंपनीने यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक १ शेअरमागे १ बोनस शेअर दिला. शेअरची लिक्विडिटी वाढवण्यासाठी आणि त्याची किंमत कमी करण्यासाठी कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स जारी करते. बोनस शेअरनंतर कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अधिक परवडणारे ठरतात.

५ वर्षांत ३६०० टक्क्यांहून अधिक तेजी

गेल्या ५ वर्षात स्काय गोल्डच्या शेअरमध्ये ३६०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाशी संबंधित स्काय गोल्ड या कंपनीचा शेअर ६ नोव्हेंबर २०१९ रोजी ९० रुपयांवर होता. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३६०६.०५ रुपयांवर पोहोचला आहे. स्काय गोल्डच्या शेअरमध्ये गेल्या २ वर्षात २०००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 

२ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीचा शेअर १६१ रुपयांवर होता. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी स्काय गोल्डच्या शेअरने ३६०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. स्काय गोल्डच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३६८७ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६८०.३५ रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकसोनं