Join us

देशातील उत्पादन क्षेत्रामध्ये फेब्रुवारीत किंचित घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 5:19 AM

पीएमआय ५७.५; नवीन ऑर्डरमुळे घसरणीला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्रात (मॅन्युफॅक्चरिंग) फेब्रुवारीमध्ये किंचित घसरण झाली आहे. ‘आयएचएस मार्केट इंडिया’ने जारी केलेला मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) फेब्रुवारीत किंचित घसरून ५७.५ झाला आहे. जानेवारीमध्ये तो ५७.७ होता. दीर्घकालीन सरासरी ५३.६ अंकांच्या मात्र तो बराच वर राहिल्याचे दिसून येते. ५० अंकांच्या वरील पीएमआय वृद्धी, तर ५० च्या खालील घसरण दर्शवितो.आयएचएस मार्केटच्या आर्थिक सहयोगी संचालिका पॉलियाना डे लिमा यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये नव्या ऑर्डर्स उत्पादकांना मोठ्या प्रमाणात मिळाल्या. त्यामुळे घसरणीला ब्रेक लागला. वाढता कार्यभार सांभाळण्यासाठी योग्य स्रोताची व्यवस्था कंपन्यांना करता आली असती तर उत्पादनातील वृद्धी चांगली राहिली असती. उत्पादनाला गती देण्यात कंपन्यांना अपयश आल्याचे थकीत व्यवसायात अचानक झालेली वाढ तसेच साठ्यांत झालेली कपात यावरून दिसते.कोविड-१९ विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढत असल्यामुळे काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून रोजगारात घसरण झाली आहे. लिमा यांनी सांगितले की, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम जाेरात सुरू झालेली आहे. त्यामुळे सध्याचे निर्बंध लवकरच हटविले जातील, अशी अपेक्षा   आहे. लोकसंख्येच्या मोठ्या भागाचे लसीकरण झाल्यानंतर निर्बंध हटविण्यास सुरूवात होईल. त्यानंतर आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होत जाईल, असे कंपन्यांना वाटते. त्याचा चांगला परिणाम उत्पादनावर होईल, अशी कंपन्यांची अपेक्षा आहे. 

मागणी वाढण्याची शक्यताआगामी १२ महिन्यांत वस्तू उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. लिमा यांनी सांगितले की, मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपन्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी कच्च्या मालाची जोरदार खरेदी सुरू केली आहे. फेब्रुवारीमध्ये उत्पादनपूर्व साठ्यात इतिहासात प्रथमच मोठी वाढ झाली आहे.