नवी दिल्ली : मुंबई शेअर बाजारात यंदा बड्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्या आणि मध्यम कंपन्यांनी अधिक चांगली कामगिरी केली आहे. जागतिक तसेच देशांतर्गत पातळीवरील वाढीच्या चिंतेमुळे सेन्सेक्सला विक्रीच्या माऱ्याचा सामना करावा लागत आहे. स्मॉलकॅप आणि मीडकॅप कंपन्या त्यापासून मुक्त आहेत.१ एप्रिल ते १ आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या काळात मीडकॅप निर्देशांक २.३१ टक्क्यांनी वाढून १0,८१८.६८ अंकांवर पाहोचला. स्मॉलकॅप निर्देशांक १.३९ टक्क्यांनी वाढून ११,0४२.६0 अंकांवर गेला. या उलट ३0 ब्ल्यूचीप कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ६.२१ टक्क्यांनी घसरून २६,२२0.९५ अंकांवर आला. ४ मार्च २0१५ रोजी सेन्सेक्स ३0,0२४.७४ अंकांवर होता. ही त्याची सार्वकालिक सर्वोच्च पातळी ठरली होती. त्यानंतर सेन्सेक्सने संपूर्ण वाढ गमावली. ८ सप्टेंबर रोजी तो २४,८३३.५४ अंकांवर आला होता. हा त्याचा एक वर्षाचा नीचांक ठरला होता. गेल्या २४ आॅगस्ट रोजी सेन्सेक्स १,६२४.५१ अंकांनी घसरला होता. ही सेन्सेक्सची सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण ठरली होती. या एकाच दिवसांत गुंतवणूकदारांची ७ लाख कोटी रुपयांची पुंजी बुडाली. १0 आॅगस्ट रोजी मीडकॅप निर्देशांक ११,६६६.२४ अंकांवर पोहोचला होता. हा त्याचा सार्वकालिक उच्चस्तर होता. स्मॉलकॅपने ५ आॅगस्ट रोजी १२,२0३.६४ अंकांना स्पर्श करून आपला सार्वकालिक उच्चांक केला. व्यावसायिकांनी सांगितले की, स्थानिक गुंतवणूकदार मुख्यत: छोट्या कंपन्यांचे समभाग खरेदी करण्यास प्राधान्य देतात. या उलट विदेशी गुंतवणूकदार ब्ल्यूचीप कंपन्यांना प्राधान्य देतात.
शेअर बाजारात छोट्या आणि मध्यम कंपन्यांनी केली बड्या कंपन्यांवर मात
By admin | Published: October 02, 2015 11:21 PM