नवी दिल्ली : भारतात लक्झरी कारच्या मागणीत सातत्याने वाढ होत असून त्याचा फायदा उठविण्यासाठी कंपन्या छोट्या व मध्यम शहरांत विस्तार करण्याची तयारी करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, लक्झरी कारची मागणी केवळ महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. छोट्या व मध्यम शहरांत स्टार्टअप्स तसेच उद्योजकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तेथेही महागड्या गाड्यांची विक्रीत होत आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाने अलीकडेच २५ आऊटलेट्सना ‘लक्झरी लाउंज’मध्ये परिवर्तित करण्याची घोषणा केली आहे. त्यावर कंपनी १५० कोटी रुपये खर्च करत आहे. गेल्यावर्षी बंगळुरूत अल्ट्रा लक्झरी कार बाजार ३५ टक्के वाढला आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी ब्रिटनची लक्झरी कार उत्पादक कंपनी ॲस्टन मार्टिनने दक्षिण भारतात नवीन डिलरशीप उघडण्याची तयारी चालवली आहे.
ऑडी इंडियाच्या ऑडी अप्रूव्ड प्लस फॅसिलिटींची संख्या २०२० मध्ये केवळ ७ होती. ती आता वाढून २७ झाली आहे. कंपनीचे ६४ पेक्षा अधिक टच पॉइंट म्हणजे विक्री केंद्रे देशात झाली आहेत.
लँबोर्गिनी दक्षिणेत प्रसिद्ध लक्झरी कार ब्रँड लँबोर्गिनीही दक्षिण भारतात विस्तार करण्याची योजना तयार करत आहे. छोट्या शहरांत डिलरशीप सुरू करण्यावर विचार कंपनी करत आहे, असे लँबोर्गिनीचे आशिया-प्रशांतचे संचालक फान्सिस्को स्कार्डाओनी यांनी सांगितले.