SJVN Ltd च्या शअरमध्ये सातत्याने तेजी दिसत आहे. कंपनीचा शेअर आज मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारातच 9.82% ने वधारून 62.75 रुपयांवर पोहोचला होता. हा शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. यापूर्वी सोमवारीही कंपनीच्या शेअरने सर्वकालिन उच्चांक गाठला होता. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी येण्यामागे कारणही तसेच आहे. खरे तर, या कंपनीला पंजाब आणि अरुणाचल प्रदेश सरकारकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे.
अरुणाचल प्रदेश सरकारने या कंपनीला एकूण 5,097 मेगावॅटचे पाच प्रोजेक्ट अॅलॉट केले आहेत. यात 3,097 मेगावॅट एटालिन, 680 मेगावॅट अटुनली, 500 मेगावॅट एमिनी, 420 मेगावॅट अमुलिन आणि 400 मेगावॅट मिहुमडन यांचा समावेश आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या सर्व पाचही योजना दिबांग बेसिनमधील आहेत. यामुळे संसाधनांचा योग्य उपयोग होईल आणि योजना वेळेत पूर्ण होतील. या प्रकल्पांच्या विकासासाठी 50,000 कोटी रुपयां पेक्षाही अधिकची गुंतवणूक केली जाईल.
यापूर्वी, SJVN च्या एका युनिटने पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशनसोबत 7,000 कोटी रुपयांचा करार केला होता. कंपनीने, संपूर्ण मालकी असलेली तिचीच उपकंपनी असलेल्या SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या माध्यमाने, 1200 मेगावॅट सौर उर्जेच्या खरेदीसाठी शुक्रवारी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशनकडून ठेका मिळाला आहे.कंपनीच्या शेअरची स्थिती - एसजेव्हीएन लिमिटेडचा शेअर गेल्या पाच दिवसांत 33 टक्क्यांनी वधारला आहे. या वर्षात YTD मध्ये या शेअरने 73.89 टक्के, तर एका वर्षात 114.24 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तसेच, गेल्या पाच वर्षात या शेअरने 126.16 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)