नवी दिल्ली- देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं स्वतःच्या ग्राहकांसाठी एक अलर्ट दिला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख जसजशी जवळ येतेय. तसे लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून जाळ्यात फसवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून करदात्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावे एसएमएस पाठवले जातायत. यात रिफंड मिळवून देतो, असे सांगत ग्राहकांकडून बँकेची माहिती मागितली जात आहे.
परंतु इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अशा प्रकारची कोणतीही माहिती एसएमएसच्या माध्यमातून मागवत नाही. तसेच अशा प्रकारच्या घटनांना काही ग्राहक बळी पडले असून, त्यांनी प्राप्तिकर परताव्यासंबंधित आलेल्या काही एसएमएसच्या लिंकवर व्यक्तिगत माहिती दिली आहे. अशा पद्धतीनं चोर ग्राहकांची व्यक्तिगत माहिती चोरून गंडा घालण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ग्राहकांना सतर्क राहण्याच्या सूचना एसबीआय बँकेकडून देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या एसएमएसला दुर्लक्षित करा किंवा त्यांना ब्लॉक करा. पण त्यांना कोणतीही माहिती देऊ नका. जर तुम्ही कोणाला एसएमएसच्या माध्यमातून स्वतःची खासगी माहिती दिली असल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधा, असं आवाहनही बँकेनं केलं आहे.
बँकेनं यासंदर्भात एक व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. त्यात तुम्हाला आलेल्या एसएमएसवरच्या लिंकवर क्लिक केल्यास तो तुम्हाला भलत्याच वेबसाइटवर घेऊन जातो आणि तुमची खासगी माहिती मागतो, असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. तुम्ही तुमची व्यक्तिगत माहिती दिल्यास ते तुमचं अकाऊंट खाली करू शकतात.
लाखो लोकांना लावू शकतात चुना
एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही तिस-या व्यक्तीला स्वतःच्या बँकेची माहिती दिल्यास तुम्हाला ती व्यक्ती लाखोंचा गंडा घालू शकते. ही माणसं तुमची वैयक्तिक माहिती चोरून पैशांची अफरातफर करतात. इन्कम टॅक्स विभाग करदात्यांना कोणत्याही प्रकारचे एसएमएस पाठवत नाही. तसेच अशा प्रकारच्या घटनांपासून ग्राहकांनी सतर्क राहिलं पाहिजे. कोणत्याही ग्राहकानं त्यांना आलेल्या मेलला उत्तर देऊ नये. तसेच बँकेची माहिती आणि क्रेडिट कार्डसंदर्भातील माहिती कोणाशीही शेअर करू नये, असंही बँकेनं सांगितलं आहे.
Be aware! Some SMS messages related to income tax refunds are a pretext to stealing your personal information. Stay alert and ignore and/or block the senders of these messages. In case your details are compromised, report it to SBI immediately.#SBI#SafetyTips#SecurityTipspic.twitter.com/7e91yoltYp
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 29, 2018