Join us  

स्नॅपडीलची विक्री आता अटळ

By admin | Published: April 11, 2017 4:25 AM

स्नॅपडीलचे सहसंस्थापक कुणाल बहल आणि रोहित बन्सल यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नावे एक ई-मेल पाठविला असून, कंपनीचे भवितव्य आता आपल्या हाती नसल्याची

बंगळूर : स्नॅपडीलचे सहसंस्थापक कुणाल बहल आणि रोहित बन्सल यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नावे एक ई-मेल पाठविला असून, कंपनीचे भवितव्य आता आपल्या हाती नसल्याची हतबलता त्यात व्यक्त केली आहे. कंपनीची विक्री अटळ असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत. स्नॅपडीलची सर्वांत मोठी गुंतवणूकदार कंपनी सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पने स्नॅपडील फ्लिपकार्ट अथवा पेटीएम यांना विक्री करण्यासाठी बोलणी सुरू केल्याचे वृत्त २२ मार्च रोजी प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी स्नॅपडीलने हे वृत्त फेटाळले होते. तथापि, आता कंपनीचे सहसंस्थापक बहल आणि बन्सल यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये हे वृत्त फेटाळले नाही. बहल आणि बन्सल यांनी आपल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, ‘अलीकडे स्नॅपडीलशी संबंधित अनेक बातम्या माध्यमांतून येत आहेत. आपले गुंतवणूकदार वाटाघाटी करीत आहेत. मात्र, माझे आणि रोहितचे मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांचे हित पाहणे हेच आहे. आम्हाला जे करणे शक्य आहे, ते आम्ही करू. कर्मचाऱ्यांचा रोजगार समाप्त होणार नाही, याचीच आम्ही काळजी घेत आहोत.’ जानेवारीपासून स्नॅपडीलने (जास्पर इन्फोटेक प्रा. लि.) शेकडो नोकऱ्यांची कपात केली आहे. सवलती आणि जाहिरातींवरचा खर्च कमी केला आहे. कंपनीला नव्याने निधी मिळणे बंद झाले आहे. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन या बड्या कंपन्यांनी स्नॅपडीलचा व्यवसाय संपविला आहे. त्यामुळे स्नॅपडीलची विक्री करणे आता अटळ ठरले आहे. तथापि, कंपनीची विक्री तीन मोठ्या गुंतवणूकदारांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. (वृत्तसंस्था)गुंतवणूकदारांत मतभेद- नेक्सस व्हेंचर पार्टनर्स, कलारी कॅपिटल आणि सॉफ्ट बँक यांची स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक आहे. कंपनीचे मूल्य किती, यावरून तिन्ही गुंतवणूकदार संस्थांत पराकोटीचे मतभेद आहेत. फेब्रुवारी २0१६ मध्ये कंपनीचे मूल्य ६.५ अब्ज डॉलर ठरविण्यात आले होते. तथापि, तेवढी रक्कम मिळणे कठीण आहे. गेल्या आठवड्यात तिन्ही गुंतवणूकदार कंपन्यांनी मतभेद मिटविण्यासाठी बैठक घेतली होती. फ्लिपकार्ट किंवा पेटीएम यापैकी एका कंपनीला स्नॅपडीलची विक्री करण्यासाठीही बोलणी सुरू करण्यात आली.