दरवर्षी कोटी कोटींमध्ये पगार असलेल्या नोकऱ्या मिळविणाऱ्या आयआयटीच्या हुशार पोरांना यंदा कोणी विचारेनासे झाले आहे. २०२४ मध्ये पासआऊट झालेले सुमारे ७००० विद्यार्थी नोकरीविना असल्याचे समोर आले आहे. आयआयटीच्या दारात रांगा लावणाऱ्या कंपन्यांनी हात आखडते घेतल्याने आयआयटी प्लेसमेंटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
देशभरात २३ आयआयटी आहेत. या संस्थांमधील जवळपास ३८ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच मिळालेली नाही. आयआयटी कानपुरच्या माजी विद्यार्थ्याने धीरस सिंह याने आरटीआयद्वारे याची माहिती मागितली होती. यामध्ये ही धक्कादायक आकडेवारी आली आहे. देशात कमालीची बेरोजगारी असल्याची आकडेवारी नुकतीच आली होती. यात आयआयटीच्या लोकांनाही कोणी नोकऱ्या देईना म्हटले तर नवल वाटायला नको असे माहिती अधिकारातल्या आकडेवारीवरून वाटत आहे.
आयआयटी दिल्लीने आपल्या माजी विद्यार्थ्यांना मेल करून २०२४ च्या विद्यार्थ्यांना नोकरी बघण्यास व कंपन्यांकडे रेफरन्स देण्याबाबत कळविले आहे. एवढेच नाही तर आयआयटी मुंबई, बिर्ला इन्स्टिट्यूट यांनी देखील आपल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आहे.
दिल्ली आयआयटीने यंदाचे प्लेसमेंट संपत आले तरी आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. आम्ही अनेक प्रयत्न केले तरी ४०० विद्यार्थ्यांना अजून नोकरी मिळालेली नाही. यामुळे आम्ही माजी विद्यार्थ्यांना संपर्क करत आहोत, असे मेलमध्ये म्हटले आहे. तुमची मदत मिळाली तर विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकेल आणि ते करिअर सुरु करू शकतील, असे यामध्ये नमूद केले आहे.
बिर्ला इन्स्टिट्यूटने दोन महिन्यांपूर्वीच माजी विद्यार्थ्यांना संपर्क केला होता. मुंबई आयआयटीमध्ये प्लेसमेंट अजून सुरु आहे. ती जूनच्या अखेरपर्यंत चालू राहणार आहे. अद्याप २५० विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेली नाही.
23 IIT मध्ये 7,000 हून अधिक IIT विद्यार्थ्यांना या वर्षी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकऱ्या मिळू शकलेल्या नाहीत. दोन वर्षांपूर्वी ही संख्या 3,400 होती. ChatGPT चे हे पहिले परिणाम करणारे वर्ष आहे. दोन लोक तीन लोकांचे काम करू शकत असतील, तर आम्ही आधीच 30% ने भरती कमी केली आहे. तसेच आधीच भरती खूप झाली आहे. शिवाय निवडणुका आहेत. यामुळे या सरकारांची धोरणे पाहून कंपन्या पुढील निर्णय घेणार आहेत. यामुळे कंपन्यांनी थांबा आणि पहा अशी भुमिका घेतल्याचे बिट्स समुहाचे अध्यक्ष व्ही रामगोपाल राव यांनी सांगितले.