वॉशिंग्टन :
गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ॲमेझॉन यांसारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्यामुळे अमेरिकेतील हजारो भारतीय आयटी व्यावसायिक बेरोजगार झाले. व्हिसा नियमांनुसार आवश्यक असलेल्या विहित मुदतीत नवी नोकरी न मिळाल्यास त्यांना मायदेशी परतावे लागणार आहे.
अमेरिकेत आलेल्या विदेशी व्यक्तीची नोकरी गेल्यास नवी नोकरी शोधण्यासाठी त्याच्याकडे काही महिन्यांचा वेळ असतो. तेवढ्या कालावधीत नोकरी न मिळाल्यास त्याचा व्हिसा रद्द होतो. एच-१बी व्हिसावरील कर्मचाऱ्यांना तर ६० दिवसांच्या आत नवी नोकरी शोधावी लागते.
२ लाख कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर २०२१ पासून गेल्या नोकऱ्या
३० ते ४० टक्के कर्मचारी भारतीय एच-१बी आणि एल१ व्हिसावर अमेरिकेत आले
एच-१ व्हीसावरील कर्मचाऱ्यांची गोची
एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले, की मी ‘सिंगल मदर’ आहे. मुलगा हायस्कूल ज्युनिअर इयरमध्ये शिकतो. आमच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण आहे, असे तिने सांगितले.
मालमत्ता विकण्याची येईल वेळ
कुटुंबांसाठी ही अत्यंत घातक परिस्थिती आहे. ज्यांनी अमेरिकेत मालमत्ता घेतलेल्या आहेत, त्या विकाव्या लागू शकतात. मुलांच्या शिक्षणातही मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
कर्मचारी एकवटले, संघटितपणे शोध
बेरोजगार झालेल्या आयटी व्यावसायिकांनी संघटितपणे नोकऱ्या शोधण्याचा प्रयत्नही चालविला आहे. ८०० भारतीय आयटी व्यावसायिकांनी व्हॉटसॲप ग्रुप बनविले आहेत. रिक्त जागांची माहिती ते या ग्रुपवर पोस्ट करतात.