Car Insurance Policy : देशात दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. रस्त्याने माणसांपेक्षा वाहने जास्त दिसतात. अशात अपघात होण्याची शक्यताही वाढते. तुमच्याकडेही कार किंवा कोणतेही वाहन असेल तर काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा आपात्कालीन परिस्थिती मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. कुठल्याही वाहन चालकाला कार इन्शुरन्स पॉलिसी माहिती असणे गरजेचे आहे. मोटार वाहन कायदा 1988 नुसार, सर्व वाहनधारकांनी मोटार विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे.
वाहन विमा हा आरोग्य विम्याइतकाच महत्त्वाचा आहे. कधी अपघात झाला की वाहन चोरीला गेले तर अशा प्रकरणात तुम्हाला नुकसाईन भरपाई मिळते. सोबत आपल्या वाहनाकडून कुठल्या तिसऱ्या व्यक्तीस शारीरिक इजा किंवा मालमत्तेच नुकसान झाले तर ती भरपाई आपल्या वतीने इन्शुरन्स कंपनी भरते. मात्र, अनेक परिस्थितीत तुमचा विमा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींची कल्पना आधीच असणे आवश्यक आहे.
कारमध्ये नियमित बिघाड
कुठल्याही वाहनाची एक वयोमर्यादा असते. तिची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. अन्यथा गाडीमध्ये बिघाड होण्याची शक्यता वाढते. पॉलिसीबाझार नुसार, वाहनाच्या नियमित झीज झाल्यामुळे आवश्यक असलेली कोणतीही देखभाल किंवा दुरुस्तीसाठी कार विमा पॉलिसी अंतर्गत क्लेम मिळत नाही.
खाजगी वस्तूंचे नुकसान
याठिकाणी एक महत्त्वाचा नियम समजून घेणे गरजेचं आहे. जर तुमच्या कारचा अपघात झाला किंवा तोडफोड झाली तर तुमची विमा कंपनी तुमच्या कारचे नुकसान भरून देते. मात्र, कारमध्ये ठेवलेली एखादी खाजगी वस्तू जसे की लॅपटॉप, फोन किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोर झाली तर नुकसान भरपाई मिळत नाही.
आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवणे
ड्रायव्हिंग लायसन्स, पीयूसी प्रमाणपत्र, कार नोंदणी प्रमाणपत्र आणि कार विमा पॉलिसी यासारख्या आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत, तुमचा कधी अपघात झाला आणि तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे नसल्यास, तुम्हाला नुकसान किंवा नुकसानीचे कोणतीही भरपाई मिळत नाही.
व्यावसायिक कारणांसाठी खाजगी कारचा वापर
अनेक वाहनचालक ही चूक करताना पाहायला मिळतात. आपले खाजगी वाहनाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करतात. जेव्हा खाजगी वाहन व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तुमचा विमा कंपनी कव्हरेज देणार नाही. जर तुमची कार तुमच्या व्यवसायाशी संबंधित काहीही घेऊन जाण्यासाठी वापरली जात असेल. आणि तिला अपघात किंवा काही नुकसान झाले तर कुठलीही मदत मिळत नाही.
वाहतूक नियमांचे उल्लंघन
जर तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आणि अशा परिस्थितीत तुमचे कोणतेही नुकसान झाले, तर तुम्हाला त्या काळात झालेल्या कोणत्याही नुकसानीचे कव्हर मिळणार नाही. मद्यपान करून वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे किंवा सिग्नल तोडणे यासारख्या रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वाहन चालवताना ट्रॅफीक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दुसऱ्याची कार वापरत असाल
जर तुम्ही दुसऱ्याची कार चालवत असाल किंवा कार भाड्याने घेतली असेल. अशा वाहनाचा अपघात झाल्यास तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. विमा कंपनी केवळ पॉलिसीधारकाच्या नावावर नोंदणीकृत कारसाठी केलेल्या दाव्यांसाठी पैसे देते. त्याचप्रमाणे, जर तुमचा जोडीदार किंवा कुटुंबातील दुसरा सदस्य तुमची कार चालवत असेल आणि अपघात झाला तर विमा कंपनी तुमचा क्लेम नाकारू शकते.
कार विमा पॉलिसी रिन्यूअल न करणे
कार विमा पॉलिसी वेळोवेळी रिन्यूअल करणे फार आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही आतापर्यंत खरेदी केलेल्या विम्याचे सर्व पैसे पाण्यात जातील. तुमचा विमाकर्ता तुम्हाला कॉल, एसएमएस किंवा ईमेलद्वारे रिन्यूअलच्या सूचना पाठवत असतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमच्या पॉलिसीची मर्यादा संपली असेल तर अपघातात तुम्हाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.
कारमध्ये काही बदल केले तर कंपनीला माहिती द्या
बरेच लोक त्यांच्या कारमध्ये उत्तम ब्रेकिंग सिस्टीम, चेसिस ब्रेसिंग, एलएसडी, इंजिन करेक्शन सारखी डिव्हाइस जोडतात. तुम्ही तुमच्या कारमध्ये कोणतीही अॅक्सेसरीज लावत अशाल तर तुमच्या विमा कंपनीला कळवायला विसरू नका अन्यथा तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.