एखादं छानसं घरं आणि अलिशान गाडी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीकडून सर्वसामान्यांच्या कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. स्वस्तात आधुनिक आणि चांगल्या अलिशान गाड्या उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होतो. त्यातूनच, रतन टाटा यांनी सर्वसामान्यांसाठी पाहिलेलं स्वप्न म्हणून टाटाची नॅनो कार रस्त्यावरुन धावली. तर, महिंद्राच्या बोलेरो आणि स्कॉर्पिओनेही ग्रामीण भागात धुमाकूळ घातला होता. आता, टोयोटाच्या फॉर्च्युनर कारची चलती आहे. भारतीय ग्राहकांमध्ये फॉर्च्युनर गाडीला मोठी पसंती मिळत आहे.
फॉर्च्युनर ही महागातील एसयुव्ही कार आहे, याची शो-रुम किंमत ३३.४३ लाख रुपयांपासून ते ५१.४४ लाख रुपयांपर्यंत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एसयुव्ही बजेटच्या बाहेर आहे. त्यामुळे, कंपनीकडून सर्वसामान्यांच्या बजेटमधील एसयुव्ही फॉर्च्युनर लाँच केली जाण्याची शक्यता आहे. जी कार लूक आणि फिचर्सच्या बाबतीत सध्याच्या फॉर्च्युनरसारखीच असेल. पण, पावरच्या बाबतीत कमी असेल.
नुकतेच टोयोटाने इनोव्हेटीव्ह इंटरनॅशनल मल्टी पर्पज व्हेईकल (IMV 0) नावाच्या प्लॅटफॉर्मला शोकेस केले आहे. ज्यामध्ये विविध कस्टमाइजेबल आर्किटेक्चर आहे, ज्याद्वारे वेगवेगळ्या रेंजच्या एसयूव्ही बनवल्या जाऊ शकतील. त्यातच, एक स्वस्तातील टोयोटा फॉर्च्यूनर असू शकते. भारतासारख्या देशामध्ये एसयूव्हीची क्रेझ पूर्ण करण्यासाठी कंपनीकडून स्वस्तातील फॉर्च्यूनर कार बाजारात उतरवली जाऊ शकते.
टोयोटो फॉर्च्युनरला २ प्रकारचे इंजिन आहे. त्यापैकी, एक २.७ लिटर पेट्रोल इंजिन, १६६ पीएस पॉवर आणि २४५ न्यूटन मीटरचे पीक टॉर्क जनरेट करते. तर, २.८ लिटर टर्बो डिझेल इंजिन २०४ पीएसची सर्वाधिक पॉवर आणि ५०० न्यूटन मिटरचा पिक टॉर्क जनरेट करते. यास ५ स्पीड मॅन्यूअल, ६ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये बनवण्यात आलं आहे. डिझेल इंजिनला ४ व्हील ड्राईव्हट्रेनमध्ये सादर केलं गेलं आहे.