नवी दिल्ली : देशातील आघाडीची एफएमसीजी कंपनी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ने आपले विविध साबण आणि डिटर्जंटसच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आधीच महागाईचे चटके सहन करणाऱ्या गृहिणींची घरखर्च भागविताना दमछाक होणार आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर ही एफएमसीजी क्षेत्रातील नेतृत्वस्थानी असणारी कंपनी आहे. त्यामुळे या दरवाढीचा कित्ता इतर कंपन्यांकडूनही गिरवला जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या उत्पादनांच्या किमतींत ३.५ टक्के ते १४ टक्के वाढ करण्यात आली आहे. सर्वाधिक वाढ ही कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्फ एक्सेलसारख्या ‘हाय एंड’ उत्पादनामध्ये झाली आहे. सर्फ एक्सेल ईझीच्या एक किलोच्या पाकिटाचा दर १०० रुपयांवरून ११४ रुपये झाला आहे. लक्सच्या फाईव्ह-इन-वन पाकिटाची किंमत १२० रुपयांवरून १२८ ते १३० रुपये करण्यात आली आहे. ७७ रुपये किलोची रिन पावडर ८२ रुपये झाली आहे. व्हीलचे दर ५६ रुपये किलोवरून ५८ रुपये किलो झाले आहेत. लाईफबॉय साबणांचे दर ८ ते १२ टक्क्यांनी वाढले आहेत. काही उत्पादनांची दरवाढ कंपनीने टाळली असली, तरी नुकसान भरून काढण्यासाठी पाकिटांमधील उत्पादनांचे वजन अथवा नगांची संख्या कमी करण्यात आली आहे. उदा. ५० रुपये किमतीच्या सर्फ एक्सेलच्या पाकिटातील पावडर २५० ग्रॅमवरून २२० ते २३० ग्रॅम करण्यात येत आहे.
सूत्रांनी सांगितले की, अशाच प्रकारचा निर्णय अन्य कंपन्यांनी घेतल्यास सर्वच वस्तूंचे दर वाढतील. त्यातून घरखर्च भागविणे कठीण होईल.
कच्च्या मालाच्या किमतीत वाढकच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पाम तेलासह सर्व प्रकारच्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे आपल्यावर दर वाढविण्याचा दबाव होता. त्याअनुषंगाने कंपनीने लाँड्री ते स्किन क्लिनिंग श्रेणीतील उत्पादनांच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.