नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने देशभरातील सरकारी इमारतींच्या छतावर सौर पॅनलर बसवून वीज निर्मिती करण्याची योजना आखली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत याद्वारे ४२.५0 मेगावॅट वीज निर्माण केली जाणार आहे. राजधानी दिल्लीतील २0 इमारतींवर अद्ययावत वीज निर्मिती पॅनल बसविण्यात येत आहेत. वीज निर्मितीसाठी सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे तब्बल ११५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, दिल्लीत ६ सरकारी इमारतींवर १.५0 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनल्स बसविण्यातही आले आहेत. या इमारतींमध्ये निर्माण भवन, शास्त्री भवन, ईस्ट ब्लॉक, सेवा भवन (आरके पुरम), पुष्प भवन आणि लोधी रोडवरील सीजीओ कॉम्प्लेक्स यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांत या संयंत्रातून २,८६,१00 युनिट विजेची निर्मितीही झाली आहे. त्यातून विजेवरील ११.५0 लाखांचा खर्च वाचला आहे. केंद्रीय नगर विकास सचिव मधुसूदन प्रसाद यांनी आज एक बैठक घेऊन या योजनेचा आढावा घेतला. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने भारतीय सौर ऊर्जा महामंडळासोबत सर्व शासकीय इमारतींवर सोलार फोटो व्होल्टाईक पॅनल बसविण्यासाठी करार केला आहे. महामंडळाने निविदा काढून १४ संस्थांना ही कामे वितरित केली आहेत. एकूण १६ राज्यांत ही कामे होणार आहेत. ४२.५0 मेगावॅट सौर वीज निर्मिती सुरू झाल्यानंतर वीज खर्चात वर्षाला १३ कोटींची बचत होणार आहे. देशभरात २00 इमारतींवर ही यंत्रणा बसणार आहे. नेमकी किती वीज निर्मिती होत आहे, हे कळण्यासाठी नेट मीटरिंग यंत्रणा बसविण्याच्या सूचना प्रसाद यांनी संबंधितांना केल्या आहेत. याशिवाय वीज बचतीसाठी एलईडी दिवे तसेच फाईव्ह स्टार दर्जा असलेले वातानुकूलन यंत्रे सरकारी कार्यालयांत बसविण्यात येणार आहेत. या सर्व उपायांतून वर्षाला ११.४१ कोटी युनिट विजेची बचत होईल. तसेच १0३ कोटी रुपयांचा खर्च वाचेल.
कार्यालयांच्या छतांवर सौर वीज
By admin | Published: February 06, 2016 3:03 AM