नवी दिल्ली : इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसत आहे. विजेचा वापर वाढल्याने दरातही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर (Solar Rooftop) पॅनेल लावू शकता. यानंतर तुम्हाला मोफत वीज मिळेल. सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारही सहकार्य करत आहे.
विशेष म्हणजे, देशातील सोलर घरावर बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारद्वारे सोलार रूफटॉप सबसिडी योजना (Solar Rooftop Yojana) चालवली जात आहे. सोलर रूफटॉप योजनेद्वारे केंद्र सरकार देशात अक्षय ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देते. यासाठी केंद्र सरकार ग्राहकांना सोलर रूफटॉप बसविण्यावर सबसिडी देते.
20 वर्षांपर्यंत मिळेल मोफत विज
तुमच्या घराच्या छतावर सोलर रुफटॉप बसवून तुम्ही विजेचा खर्च 30 ते 50 टक्क्यांनी कमी करू शकता. दरम्यान, सोलर रुफटॉप 25 वर्षांसाठी वीज पुरवेल आणि या सोलर रुफटॉप सबसिडी योजनेत खर्च 5-6 वर्षात दिला जाईल. यानंतर तुम्हाला पुढील 19-20 वर्षे सोलारच्या विजेचा लाभ मोफत मिळेल.
सोलर पॅनलसाठी किती जागा पाहिजे?
सोलर पॅनल बसवण्यासाठी जास्त जागा लागत नाही. एक किलोवॅट सौर ऊर्जेसाठी 10 चौरस मीटर जागा लागते. केंद्र सरकार 3 KV पर्यंतच्या सोलार रूफटॉप प्लांटवर 40 टक्के अनुदान देते आणि 3 KV नंतर 10 KV पर्यंत 20 टक्के अनुदान देते. सोलर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी, तुम्ही वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही mnre.gov.in ला भेट देऊ शकता.
पैशांची होईल बचत
सोलर पॅनलमुळे विजेचे प्रदूषण कमी होण्यासोबतच पैशांचीही बचत होते. ग्रुप हाऊसिंगमध्ये सोलर पॅनल बसवल्यास विजेचा खर्च 30 ते 50 टक्क्यांनी कमी करता येतो. सोलर रुफटॉप सबसिडी योजने अंतर्गत केंद्र सरकार 500 KV पर्यंत सोलर रुफटॉप प्लांट उभारण्यासाठी 20 टक्के सबसिडी देत आहे.
असा करा ऑनलाइन अर्ज...
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी solarrooftop.gov.in वर जा.
- आता होम पेजवर 'Solar Roofing'साठी अर्जावर क्लिक करा.
- यानंतर, ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला तुमच्या राज्याच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर Solar Roof Application चे पेज ओपन होईल.
- यामध्ये सर्व अर्ज भरून अर्ज सबमिट करा.
- अशा प्रकारे तुम्ही सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.