Join us

जीएसटीमध्ये होणार अजून काही बदल, अरुण जेटलींनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 9:26 AM

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीमध्ये अजून काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. सरकारच्या महसुलाचा अंदाज घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - 1 जुलैपासून देशात लागू करण्यात आलेल्या जीएसटी करप्रणालीची घडी अद्याप व्यवस्थित बसलेली नाही. त्यामुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर जीएसटी कौन्सिलकडून जीएसटीमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीमध्ये अजून काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. सरकारच्या महसुलाचा अंदाज घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शुक्रवारी 200 हून अधिक वस्तूंवरील जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीचा गुजरात निवडणुकीशी संबंध जोडणाऱ्यांवरही जेटली यांनी टीका केली.जेटली म्हणाले, "जीएसटीवरून काही जण बालीश राजकारण करत आहेत. जीएसटीमध्ये कपात करणे शक्य होते. त्यामुळे आम्ही चार महिन्यांमध्ये 28 टक्के जीएसटी असलेल्या स्लॅबमध्ये बदल केले आहेत." 1 जुलै 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यानंतर यातील त्रुटी दूर करण्यासाठी दर महिन्याला जीएसची कौन्सिलची बैठक होत आहे. जेटली पुढे म्हणाले, येत्या काळात कराच्या दरातील बदल हे सरकारच्या महसूलाचा अभ्यास करून केले जातील. तसेच त्यात प्रक्रिये संदर्भातील बदलसुद्धा असतील. तसेच आम्ही बाजारातील परिस्थिती पाहून निर्णय घेत आहोत." तसेच जी मंडळी सिंगल जीएसटीची मागणी करत आहेत त्यांना टेरिफ स्ट्रक्चरची माहिती नसल्याचा टोलाही जेटली यांनी लगावला. अन्नधान्यावर जीएसटी लागता कामा नये, त्यामुळे अन्नधान्यावर जीएसटी लावण्यात आलेला नाही.  सर्वजामान्यांच्या गरजेच्या वस्तूंवर सर्वात कमी म्हणजे 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. मात्र लग्झरी सामान आणि पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्या वस्तूंवर कमी जीएसटी लावता येत नाही. गहू, तांदूळ, साखर यांच्यावर कार, यॉट किंवा तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे जीएसटी लावता येणार नाही. त्यामुळे जे सिंगल जीएसटीची मागणी करत आहेत. त्यांना प्राथमिक माहितीच नाही आहे.  सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय गुवाहाटी येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला होता. 227 पैकी फक्त 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला होता. अन्य 177 वस्तू 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमधून 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे च्युईंगम ते डिटरजंटपर्यंत वस्तू स्वस्त झाल्या आहेत.    विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर  28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.  1 जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब जीएसटीमध्ये आहेत. जुलै महिन्यात हा कर लागू झाल्यानंतर 227 वस्तू 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहेत. ग्रेनाईट, दाढीचे सामान, सौंदर्य प्रसाधन, मार्बल, चॉकलेट, च्युविंग गम, शेव्हींग क्रिम आणखी स्वस्त होणार आहे. एसी हॉटेलमध्ये बसल्यानंतर लागणारा 18 टक्के जीएसटी 12 टक्के करण्याची शिफारस मंत्रिगटाने केली आहे. 

टॅग्स :जीएसटीभारतअरूण जेटली