Join us  

साखर-मीठ किती आहे? कंपन्यांना पॅकेटवरच द्यावी लागणार माहिती, मोठ्या अक्षरात लिहिणं बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 11:01 AM

ग्राहकांना विकत असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ आणि सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण नेमके किती आहे, याची माहिती पॅकेटवर मोठ्या अक्षरात, ठळकपणे द्यावी लागणार आहे. जाणून घ्या का आणि काय निर्णय घेण्यात आला आहे, कसा होणार फायदा?

ग्राहकांना विकत असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ आणि सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण नेमके किती आहे, याची माहिती पॅकेटवर मोठ्या अक्षरात, ठळकपणे द्यावी लागणार आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पदार्थांच्या पॅकेटवरील पोषणासंबंधित माहितीबाबत दिलेल्या प्रस्तावाला आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली.  पदार्थांत पोषणमूल्ये किती आहेत हे जाणून घेण्यास ग्राहकांना सक्षम करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय.

खाद्य कायद्यात सुधारणा 

खाद्य प्राधिकरणाच्या ४४ व्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. खाद्य सुरक्षा आणि मानके (लेबलिंग आणि प्रदर्शन) अधिनियम २०२० मध्ये यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. साखर, मिठाच्या अती सेवनामुळे गंभीर आजार वाढले आहेत. चांगल्या आरोग्यासाठी यावर नियंत्रण ठेवण्यासाठीच ठोस पावले उचलण्याची गरज होती.

फूड पॅकवर माहिती द्यावी लागणार

वास्तविक, देशात शुगर आणि बीपीचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. कंपन्यांकडून अनेक दिशाभूल करणारे दावे केले जातात. पॅकेज्ड फ्रूट ज्युस १०० टक्के फ्रूट ज्युस म्हणून विकला जात आहे. कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे, जेणेकरून पॅकेजमध्ये असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये असलेली साखर, मीठ, फॅट्स इत्यादींचा तपशील मोठ्या आणि ठळक अक्षरात असेल आणि लोकांना ते सहज समजू शकेल.

सामान्यांना होणार फायदा

एफएसएसआयएच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे अनेक आजारांचा सामना करण्यास मदत होईल. एफएसएसएआयनं अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग आणि प्रदर्शन) नियम, २०२० मध्ये दुरुस्तीला मंजुरी दिली आहे, ज्यात कंपन्यांना नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. उत्पादनाचं पोषणमूल्य ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावं हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून ग्राहक चांगल्या प्रकारे समजू शकतील आणि योग्य निर्णय घेऊ शकतील. या निर्णयामुळे लोकांना उत्पादनाचं पौष्टिक मूल्य समजण्यास मदत होईल. मीठ, साखर आणि फॅट्सबद्दलची माहिती मोठय़ा आणि मोठ्या अक्षरात लिहिल्यामुळे ग्राहकांना ते सहज पाहता येणार असून त्यानंतर ते आपल्या आरोग्यानुसार खरेदी करू शकतील. एफएसएसएआय वेळोवेळी असे निर्णय घेत आहे. यापूर्वी अनेक कंपन्यांची उत्पादने 'हेल्थ ड्रिंक' श्रेणीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

टॅग्स :अन्नअन्न व औषध प्रशासन विभागसरकारआरोग्य