Join us

निर्बंध शिथिल होताच सोने-चांदीला आली चकाकी, चांदी ७३ हजारांपार तर सोने ५० हजारांच्या दिशेने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 6:21 AM

gold-silver : गेल्या वर्षी कोरोनाचे संकट ओढवले असता सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी सोने, चांदी खरेदीकडे आपला ओढा वळवला. त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर उच्चांकी ५६ हजार रुपये या पातळीपर्यंत गेले होते.

जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोने-चांदी खरेदीत वाढ झाल्याने भावदेखील वधारले आहेत. निर्बंध शिथिल होताच चांदीचे भाव ७३ हजारांच्या पुढे गेले असून, सोनेदेखील ५० हजारांच्या दिशेने जात आहे.सध्या चांदी ७३ हजार ५०० रुपये प्रति किलो, तर सोने ४९ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट ओढवले असता सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी सोने, चांदी खरेदीकडे आपला ओढा वळवला. त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर उच्चांकी ५६ हजार रुपये या पातळीपर्यंत गेले होते.यंदा ६ एप्रिलपासून सुवर्ण बाजार बंद असला तरी कमोडिटी बाजारात उलाढाल सुरू होती. यात अनेकांनी सोने-चांदीची खरेदी केली.  सध्या सोने-चांदी खरेदीचे प्रमाण ६७ टक्के असून २७ टक्के विक्रीचे प्रमाण आहे, तर ६ टक्के व्यवहार थांबलेले (होल्डवर) आहेत. गेल्या पाच वर्षांत सोने दुप्पट महाग झाले आहे. २७ जानेवारी २०१६ मध्ये सोन्याचा भाव २४ हजार ५०० रुपये होता. तो आता ५० हजार रुपयांच्या आसपास आहे. या वर्षाच्या अखेरीस सोने ६० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

 चांदीच्या भावात सात हजारांहून अधिक वाढ-  निर्बंध लागू झाल्यानंतर ६ एप्रिल रोजी सुवर्ण बाजार बंद झाला. तेव्हापासून ते आतापर्यंत चांदीच्या भावात सात हजार ४०० रुपये तर सोन्याच्या भावात तीन हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीची पुन्हा गुंतवणूक वाढत असल्याने या दोन्ही धातूंचे भाव वाढत आहेत. सध्या सोने-चांदी खरेदीचे प्रमाण ६७ टक्के असून २७ टक्के विक्रीचे प्रमाण आहे.

टॅग्स :सोनंचांदी