नवी दिल्ली : ज्वारी-बाजरीसह अन्य भरड धान्याच्या पिठापासून बनविलेले पदार्थ वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळण्याचा निर्णय ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या या पदार्थांवर १८ टक्के जीएसटी लागतो. तो शून्यावर आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पारंपरिक भरड धान्याच्या वापरास भारत सरकार प्रोत्साहन देत आहे. ही धान्ये पोषक तर आहेतच, पण त्याबरोबरच ती शेतात पिकविण्यासाठी अत्यंत कमी पाणी लागते. सूत्रांनी सांगितले की, किमान ७० टक्के भरड धान्याच्या पिठाचा वापर करून बनविण्यात आलेले तसेच सुटे विकले जाणारे (लेबल व पूर्व-पाकीटबंद नसलेले) खाद्य पदार्थ नव्या प्रस्तावानुसार करमुक्त होतील. या पदार्थांवरील जीएसटी शून्यावर आणण्यात येईल. लेबलसह पूर्व-पाकीटबंद असलेल्या पदार्थांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात येईल.