नवी दिल्ली - पैसे गुंतवणुकीसाठी सध्या सोनं चांगला पर्याय असल्याचं गेल्या काही महिन्यांतून दिसून आलं आहे. त्यामुळे, ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. त्यातच सरकारकडूनही सोनं खरेदीसाठी ग्राहकांना संधी उपलब्ध करुन दिली जाते. RBI सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमचा चौथा टप्पा आता सुरू झाली आहे. आजपासून तुम्ही १६ फेब्रुवारीपर्यंत सॉवरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेअंतर्गत सोन्यात गुंतवणूक करू शकता. सरकारकडून बाजार भावापेक्षा कमी दरात हे सोनं दिलं जाते. या सोन्याची ना चोरी होते ना नुकसानीत जाते. म्हणूनच, ही गुंतवणूक फायदेशीर आहे.
सॉवरेन गोल्ड बाँड यापूर्वी १८ ते २२ डिसेंबरपर्यंत खरेदी करण्याची संधी होती. आता पुन्हा एकदा सरकार गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. सॉवरेन गोल्ड बाँडचे डिमॅटमध्ये रूपांतर करता येते. हा बाँड १ ग्रॅम सोन्याचा आहे, म्हणजेच १ ग्रॅम सोन्याची किंमत ही बाँडची किंमत असेल. सॉवरेन गोल्ड बाँडद्वारे, तुम्ही २४ कॅरेटच्या ९९.९ टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता.
ऑनलाइन अर्ज केल्यावर आणि डिजिटल पेमेंट केल्यास, प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूटही मिळणार आहे. आरबीआयच्या नियमानुसार, कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान १ ग्रॅम आणि जास्तीत जास्त ४ किलो सोन्यात गुंतवणूक करू शकते.
कुठून खरेदी करता येईल
बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता, तुम्ही पोस्ट ऑफिसमधूनही ते खरेदी करू शकता. याशिवाय स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे खरेदी करता येईल. बीएसई आणि एनएसई प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करण्याचा पर्याय आहे.
हे आहेत दर
सॉवरेन गोल्ड बाँडसाठी सरकारने दर निश्चित केले आहेत. त्यानुसार, चौथ्या टप्प्यात तुम्हाला इश्यू प्राईज हा प्रति ग्रॅम ६,२६३ रुपये ठेवण्यात आला आहे. म्हणजे, बाजारातील किंमतीपेक्षा कमी किंमतीत तुम्ही येथे सोनं खरेदी करुन गुंतवणूक करू शकता. तसेच, तुम्ही ऑनलाईन गुंतवणूक करत असल्यास तुम्हाला आणखी ५० रुपयांची सूट मिळते. या गुंतवणुकीसाठीचा मॅच्युरिटी कालावधी हा ८ वर्षांचा आहे. यापूर्वी २०१५ मध्ये गुंतवणूक केलेल्यांना १२.९ टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.
हे आहेत फायदे -
या सोनं गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक २.४ टक्के व्याज मिळतं, जे दर सहा महिन्यांनी दिलं जातं. बाजारात सोन्याची किंमत वाढली की तुमच्या गुंतवणुकीचं मूल्यही वाढतं. डिमॅट असल्यानं सुरक्षेची चिंता नाही. याशिवाय जीएसटीच्या कक्षेत येत नाही, भौतिक सोन्यावर ३ टक्के जीएसटी लावला जातो. तर दुसरीकडे बाँड्सद्वारे कर्जाचा पर्यायही उपलब्ध आहे. शुद्धतेची कोणतीही अडचण नाही, कारण ते कागदी असल्यानं आपल्याला त्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. मुदतपूर्तीनंतर तुम्हाला सोन्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करण्याची संधी आहे.