जर तुम्हाला सोन्यात पैसे गुंतवण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान तुम्हाला डिजिटलसोनं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या किंमतीनुसार तुम्हाला प्रति ग्रामसाठी ४,७९० रूपये खर्च करावे लागतील. दरम्यान, ऑनलाईन पैसे भरणाऱ्या ग्राहकांना प्रति ग्रॅम सूटही दिली जाणार आहे.
अर्थमंत्रालयानं शुक्रवारी आपल्या एका वक्तव्यात सांगितलं की सॉवरेन गोल्ड बाँड योजना २०२१-२२ सीरिजचा पाचवा टप्पा ९ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. तसंच तो १३ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. जर या स्कीममध्ये तुम्ही ऑनलाईन पैसे भरले तर तुम्हाला प्रति ग्राम ५० रूपयांची सूटही मिळणार आहे. यापूर्वीच्या चौथ्या टप्प्याच्या सोवरेन बाँडसाठी सरकारनं ४,८०७ रूपये प्रति ग्राम इतकं मूल्य निश्चित केलं होतं. यापूर्वीचा टप्पा १२ जुलै रोजी खुला झाला होता आणि १६ जुलै रोजी बंद झाला होता.
काय आहे विशेष?
याची विशेषत: म्हणजे बाँड जारी झाल्याच्या पंधरवड्यात स्टॉक एक्सचेंजमध्ये तरलतेच्या अधीन होतात. तसंच गुंतवणूकदारांना सोन्याचे दर वाढल्यानंतर त्याचा लाभ मिळतोच, त्याशिवाय गुंतवणूक केलेल्या रकमेवर २.५ टक्क्यांचा फिक्स्ड इंटरेस्टही मिळतो. हा बॉन्ड तीन वर्षांपर्यंत ठेवल्यास लाँग टर्म कॅपिटल गेन लागतो. परंतु मॅच्युरिटीपर्यंत ठेवल्यास याला लाँग टर्म कॅपिटल गेन लागत नाही.
जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर याचा तुम्हाला वापर करता येतो. या बाँडचा कालावधी ८ वर्षांचा असतो. तसंच ५ व्या वर्षानंतरच तुम्ही प्रीमॅच्युअर विड्रॉव्हल करू शकता. फिजिकल गोल्डप्रमाणे यावर तुम्हाला जीएसटी आणि मेकिंग चार्जेसपासून सुटका मिळते.