Join us

मंदी दारात? तुम्ही करा अशी तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 11:26 AM

सध्या जगात आणि प्रत्येक देशात मंदीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्रकांत दडस, उपसंपादकसध्या जगात आणि प्रत्येक देशात मंदीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंदी म्हणजे काय, तर पूर्णपणे अर्थव्यवस्था ठप्प होणे. कमाईपेक्षा खर्चाचा बोजा वाढला, तर मंदी येणार हे नक्की असते. आपल्या घरातही अनेकदा वायफळ खर्च केल्यास असे प्रसंग येतात. सध्या जगासाठी पुढचे १२ महिने अतिशय नाजूक असणार आहेत, कारण  जगातील अनेक विकसनशील अर्थव्यवस्था मंदीत जातील.  याचे मुख्य कारण महागाई. आपण नागरिक म्हणून या येऊ घातलेल्या मोठ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी कसे नियोजन करावे, हे जाणून घेऊया.

नोकरी टिकवा, संधीही शोधामंदीत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नोकरी टिकवा. चांगले करिअर आणि दमदार कमाई मोठ्या मंदीवर मात करू शकते. चांगल्या करिअरसाठी कठोर परिश्रम करा आणि चांगल्या कंपनीत नोकरी शोधा. चांगल्या कंपन्या कधीही कर्मचाऱ्यांना काढत नाहीत. मंदीत पैसे कापले जातील; पण नोकरी टिकेल. ज्या कंपनीचा पाया मजबूत असेल, ती कंपनी तुम्हालाही भक्कम ठेवेल. उत्पन्न वाढवण्यासाठी इतर पर्याय शोधा. नोकरी टिकवून ठेवल्यास अनेक मोठी संकटे टळतील, हे लक्षात असू द्या. 

उधळपट्टी टाळाऑफरच्या मोहापायी उधळपट्टी करत असाल तर ते टाळा. फालतू खर्च म्हणजे पैसे पाण्यात टाकण्यासारखे आहे. महिन्याचा संपूर्ण खर्च काढा आणि जिथे नाहक खर्च होत आहे तो खर्च तातडीने कमी करा. जितकी गरज आहे, तितकीच खरेदी करा. सणासुदीच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी करणे धोक्याचे आहे. जगण्यासाठी जेवण, विमा बिल, किराणा हे आवश्यक खर्च आहेत; पण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे, सुटीची मजा आणि इंटरनेट-स्ट्रीमिंगवर होणारा अवाजवी खर्च तुम्हाला नुकसानीत टाकू शकतो. तो टाळा.

आकस्मिक निधी तयार करामंदी किंवा नोकरी गमावल्यास आपत्कालीन निधी खूप उपयुक्त आहे. तुमचा सुमारे ६ महिन्यांचा खर्च आपत्कालीन निधीत ठेवावा. भविष्यात नोकरी गेली आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन नसेल, तर त्यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो. आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी फार तयारी करावी लागत नाही. तुम्हाला फक्त तुमची बचत वाढवायची आहे. यामध्ये बँक खाते बचत करणे खूप उपयुक्त आहे. सतत बचत करत राहा, कारण त्यावर व्याजही मिळेल आणि ठेवीची रक्कमही वाढेल.

कर्ज लवकर फेडाजर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले असेल, तर ते घाईघाईने फेडण्याचा प्रयत्न करा. विशेषतः क्रेडिट कार्डवर घेतलेले कर्ज. नोकरी मंदीत जाऊ शकते, काम मंदावते. यामुळे तुमची कमाई कमी होऊ शकते; परंतु तुम्हाला कर्जाचा ईएमआय कोणत्याही परिस्थितीत भरावा लागेल. जर तुम्ही कर्जाचे पैसे किंवा बिलाची परतफेड केली नाही, तर चक्रवाढ व्याज लागेल. हे टाळण्याचा मार्ग म्हणजे जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा हे कर्ज फेडून बाहेर पडा.

टॅग्स :अर्थव्यवस्था