Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...म्हणून चॉकलेट महागले !

...म्हणून चॉकलेट महागले !

पुरवठा कमी होत असतानाच कमोडिटीच्या बाजारामध्ये अनेक सट्टेबाजांनी उड्या मारल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 07:28 AM2024-07-14T07:28:30+5:302024-07-14T07:29:37+5:30

पुरवठा कमी होत असतानाच कमोडिटीच्या बाजारामध्ये अनेक सट्टेबाजांनी उड्या मारल्या आहेत

Special Article on Climate change made chocolate more expensive | ...म्हणून चॉकलेट महागले !

...म्हणून चॉकलेट महागले !

अजित जोशी
(चार्टर्ड अकाऊंटंट) 
तुमच्या आवडत्या चॉकलेटचा आकार थोडा कमी झाल्यासारखा वाटतो का? किंवा मग परवाच झालेल्या मित्राच्या वाढदिवसाला चॉकलेट केक महाग झाला होता हे जाणवले का? येत्या काळात या किमती अजूनच वाढत जाणार आहेत. तुमच्या परिसरात विकास घडवून आणण्यासाठी नुकतीच तोडलेली झाडं किंवा पीयूसी न करता अमाप धूर ओकणारी मित्राची गाडी हे कदाचित त्याला जबाबदार असू शकेल. विचित्र वाटले ना ऐकायला? त्याकरिता सध्या चॉकलेटच्या जगात काय चालले आहे ते थोडे समजून घ्यायला हवे. 

चॉकलेट बनते कोको नावाच्या वनस्पतीतल्या पदार्थापासून. जगातल्या ८० टक्के कोकोचे उत्पादन आफ्रिकेत आणि त्यातही खासकरून आयव्हरी कोस्ट आणि घाना या आफ्रिकेतल्या दोन देशांमध्ये होते. गेल्या दोन वर्षात अनेक समस्यांमुळे तिथले कोकोचे उत्पादन घटले आहे. यात शेतीत पुरेशी गुंतवणूक होत नाही, कोको लोकप्रिय असले तरी शेतकऱ्याला फारसा भाव मिळत नाही, बेकायदेशीर खाणकाम अशी काही नेहमीची कारणे आहेतच. पण, सगळ्यात मोठे कारण आहे, वातावरणात होणारा बदल अर्थात क्लायमेट चेंज!! या क्लायमेट चेंजमुळे कोकोच्या पिकात मोठ्या प्रमाणावर म्हणजे तब्बल ४० टक्के घसरण झाली आहे. अशा प्रकारे पुरवठा कमी होत असतानाच कमोडिटीच्या बाजारामध्ये अनेक सट्टेबाजांनी उड्या मारल्या आहेत आणि किमती वाढतील, या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी केली आहे. 

या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वी साडेतीन हजार डॉलर प्रतिटन असणाऱ्या कोकोच्या किमती एप्रिलमध्ये १२,००० डॉलर प्रतिटनपर्यंत वर चढल्या आणि आता आठ हजार डॉलरवर स्थिरावल्या आहेत. 

यातल्या बाकीच्या घटकांकडे दुर्लक्ष केले तरी हवामान बदल असे परिणाम हे होत राहणारच आहे आणि त्यामुळे पहिल्याहून कमी कोकोचे उत्पादन होईल आणि किमती चढ्याच राहतील, असे दिसते.

प्रत्येक अडचणीतही कोणाचा तरी फायदा होतच असतो. गेल्या काही वर्षात भारतामध्ये ‘बिन टू बार’ ही कल्पना झपाट्याने लोकप्रिय होताना दिसते.
 
म्हणजेच छोटे छोटे उत्पादक स्थानिक पातळीवरच कोकोचे उत्पादन घेऊन छोट्या प्रमाणात त्यातून कोको पावडर निर्मिती करतात आणि त्यातून पारंपरिक पद्धतीची चॉकलेट बनवण्याऐवजी स्वतःच्या ब्रँडची वेगळ्या चवीची खास चॉकलेट बनवतात. 

हवामान बदलाचा आफ्रिकेएवढा मोठा फटका न बसल्यामुळे हा व्यवसाय शाबूत आहे आणि कदाचित या व्यवसायाला भविष्यात फायदा होईल, असेही म्हटलं जातं. अर्थात आकडेवारीच्या संदर्भात हा अतिशय छोटा व्यवसाय आहे, यात शंका नाही.
 
मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात अपरिहार्यपणे कित्येक चॉकलेट बनविणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या निकालावर याचा परिणाम झाला आहे. या परिस्थितीला चॉकलेटच्या जगात वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जाण्याचे प्रयत्न होत आहेत. 

काही कंपन्यांनी कोकोवर अवलंबून नसणाऱ्या मिठाया, उदाहरणार्थ हर्षेचा मिल्क बार, अधिकाधिक विकले जावे, यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. अनेक नामांकित आणि महागड्या चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांनी आपले चॉकलेटचे भावही वाढवले आहेत. 

येणारा काळ या क्षेत्रासाठी कठीण आहे. पण, क्लायमेट चेंज ही आपल्याला वाटते त्याप्रमाणे कुठेतरी नजरेआड घडणारा घटना नसून, ती आपल्या घरापर्यंत, अगदी आपल्याला लहान मुलांच्या चॉकलेटपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, हे खरेच!!
 

Web Title: Special Article on Climate change made chocolate more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.