नवी दिल्ली : कोविड-१९ साथीचा संसर्ग कमी झाल्यामुळे भारतीय रेल्वेने येत्या सप्टेंबरमध्ये चारधाम यात्रेसाठी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी बद्रिनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम् आणि द्वारकाधीश यांसह देशातील अनेक महत्त्वपूर्ण तीर्थस्थळांची यात्रा भाविकांना घडवील.
सूत्रांनी सांगितले की, रामायण सर्किटवरील ‘श्री रामायण यात्रा’ रेल्वेगाडी लोकप्रिय झाल्यामुळे आयआरसीटीसीने ‘देखो अपना देश’ योजनेअंतर्गत चारधाम यात्रेसाठी डिलक्स एसी पर्यटन ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, १६ दिवसांची ही यात्रा १८ सप्टेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुरू होऊन बद्रिनाथला जाईल. या यात्रेत चीन सीमेवरील माना गाव, नरसिंह मंदिर (जोशी मठ), ऋषिकेश, जगन्नाथ पुरी, गोल्डन बीच, कोणार्क सूर्य मंदिर, चंद्रभागा तट, धनुषकोडीसह रामेश्वरम्, नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश, शिवराजपूर समुद्र तट आणि द्वारका बेट इत्यादी तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
या रेल्वेसाठी एका व्यक्तीचे भाडे पॅकेज स्वरूपात ७८,५८५ रुपये असेल. त्यात डिलक्स हॉटेलात राहण्याची व्यवस्था, जेवण आणि प्रवास विमा यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष बुकिंग १२० पर्यटकांचे घेतले जाईल. १८ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या पर्यटकांस कोविड-१९ ची किमान एक लस घेतलेली असणे बंधनकारक आहे.
- या यात्रेत भाविकांना ८,५०० कि.मी.चा प्रवास घडवला जाईल. डिलक्स एसी गाडीत डायनिंग रेस्टॉरंट, अत्याधुनिक किचन, शॉवर क्युबिकल्स, सेंसर-आधारित वॉशरूम आणि फूट मसाजर इत्यादी सोयी-सुविधा मिळतील. रेल्वेत सुरक्षेचीही पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. गाडीच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील. सुरक्षा रक्षक तैनात केले जातील.