नवी दिल्ली : महागाई आणि जॉब क्रायसिसच्यादरम्यान जगभरात सुरू असलेल्या नोकर कपातीचा परिणाम आता भारतातही नोकऱ्यांवरही होऊ लागला आहे. भारताची बजेट एअरलाइन स्पाइसजेटही हजारो कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कंपनीने आपला खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
ईटीच्या रिपोर्टनुसार, स्पाइसजेट 1,400 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे, जे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 15 टक्के इतके आहे. सध्या कंपनीचे एकूण कर्मचारी नऊ हजारांच्या आसपास आहेत. कंपनी सध्या सुमारे 30 विमाने चालवत आहे, त्यापैकी 8 भाडेतत्त्वावर घेतली आहेत. रिपोर्ट नुसार, एअरलाइनने देखील नोकर कपातीची पुष्टी केली आहे.
माहितीनुसार, गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी कंपनीवर खर्च कमी करण्याचा दबाव आहे. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सॅलरीचे बिल 60 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत कंपनी खर्च कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 1,400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे हा खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
ईटीच्या म्हणण्यानुसार, स्पाइसजेटच्या अनेक कर्मचाऱ्यांना कपाती संदर्भात कंपनीकडून कॉल येणे सुरू झाले आहे. यापूर्वी स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना सॅलरीसाठी विलंब होत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन देण्यास कंपनीकडून सातत्याने विलंब होत होता. अनेक कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. कंपनी काही गुंतवणूकदारांकडून 2,200 कोटी रुपयांचे भांडवल भरण्याच्या प्रक्रियेत आहे.