Spicejet: वाडिया समूहाची विमान कंपनी Go First मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया याचिका देखील मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, यातच Spicejet कंपनी दिवाळखोरीत जाते की काय, असे दावे करण्यात येत होते. हे सर्व दावे कंपनीने फेटाळले असून, Spicejet दिवाळखोरीत बिलकूल नाही. उलट बंद असलेल्या विमान सेवा कंपनीकडून पुन्हा सुरू केल्या जात आहेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
NCLT ने स्पाइसजेटला दिवाळखोरीची नोटीस पाठवली आहे. स्पाइसजेटला ही नोटीस आयर्लंडच्या विमान भाड्याने देणाऱ्या कंपनीच्या याचिकेवर जारी करण्यात आली आहे. एअरक्राफ्ट लीजिंग कंपनी एअरकॅसलने दावा केला आहे की, स्पाइसजेटकडे त्यांची थकबाकी आहे. याचिकेत एनसीएलटीला स्पाइसजेटच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती करण्यात आली. मात्र, याला उत्तर देताना स्पाइसजेटने दिवाळखोरीचे खंडन केले आहे.
अफवा पूर्णपणे निराधार आहे
दिवाळखोरीसाठी याचिका दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही. यासंदर्भातील अफवा पूर्णपणे निराधार आहे, असेही स्पाइसजेटकडून सांगण्यात येत आहे. बंद असलेली विमाने पुन्हा सुरू करण्यावर आणि अधिकाधिक विमाने पुन्हा उड्डाण करण्यावर त्यांचा भर आहे. एअरलाइनच्या तीन विमानांची नोंदणी रद्द करण्यासाठी लेझर्सने अलीकडेच विमान वाहतूक नियामक डीजीसीएशी संपर्क साधला होता, अशी माहिती स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी दिली.
दरम्यान, SpiceJet ने सरकारच्या इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) मधून एअरलाइनला मिळालेल्या अंतर्गत रोख आणि ५० अब्ज डॉलर निधीसह बंद असलेली विमाने पुन्हा उड्डाण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे, गेल्या आठवड्यात स्पाइसजेटने सांगितले होते की, विविध कारणांमुळे बंद असलेल्या आपल्या ताफ्यातील २५ विमान उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी ४०० कोटी रुपये उभारले आहेत.