SpiceJet Financial Crisis : देशातील आघाडीची विमान कंपनी SpiceJet च्या अडचणी वाढल्या आहेत. कंपनीची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीदेखील (PF) देता येत नाही. EPFO च्या म्हणण्यानुसार, स्पाइस जेटने जानेवारी 2022 मध्ये त्यांच्या 11,581 कर्मचाऱ्यांचा PF शेवटचा भरला होता. म्हणजे, गेल्या अडीच वर्षांपासून कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलेला नाही. याप्रकरणी ईपीएफओने कंपनीला नोटीस बजावली आहे.
स्पाइस जेटचे शेअर्स 7.6 टक्क्यांनी घसरलेमीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पाइस जेट प्रचंड आर्थिक अडचणीत अडकली आहे. कर्मचाऱ्यांचे पीएफ जमा करण्यात कंपनीला सातत्याने अपयश येत आहे. याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला. या वर्षी स्पाइस जेटचे शेअर्स सुमारे 7.6 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 86 टक्के वाढही नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, स्पाइस जेट फक्त कर्मचाऱ्यांचा पीएफ रोखत नाही, तर पगारही वेळेवर देऊ शकत नसल्याचा दावा काही रिपोर्टमधून करण्यात येत आहे.
केएएल एअरवेज आणि कलानिथी मारन यांनी मागितली नुकसान भरपाई यासोबतच केएएल एअरवेज आणि कलानिथी मारन यांनी स्पाइस जेट आणि अजय सिंग यांच्याकडून सुमारे 1,323 कोटी रुपयांच्या नुकसानीची मागणी केली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. हा वाद फेब्रुवारी 2015 चा आहे. मारन आणि त्यांच्या KAL एअरवेजने स्पाइसजेटमधील त्यांचा 58.46 टक्के हिस्सा अजय सिंगला हस्तांतरित केला होता. सुमारे 1,500 कोटी रुपयांचा हा सौदा होता.