Join us  

नोकरी असावी तर अशी...घरबसल्या ९५० कोटी रुपयांचे पॅकेज;  घर, कार अन् WFH काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 7:39 PM

स्टारबक्सने देऊ केलेले निकोल यांना दिलेले पॅकेज आता उघड झालं आहे. या पॅकेजमध्ये इतके शून्य आहेत की ते मोजताना तुम्हाला कंटाळा येईल.

स्टारबक्सनं त्यांच्या नव्या सीईओपदाची जबाबदारी घेणाऱ्या ब्रायन निकोल यांना मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. कॉफीच्या दिग्गज कंपनीनं निकोल यांना ११३ मिलियन (९४८ कोटी) पॅकेजची ऑफर केली आहे. ५० वर्षीय  निकोल यांना पॅकेजमध्ये १ कोटी डॉलर साइन ऑन बोनस आणि ७.५ कोटी डॉलर इक्विटी दिली आहे. निकोल यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी २.३ कोटी डॉलर पर्यंतचे अतिरिक्त वार्षिक अनुदान देखील मिळू शकते.

फॉर्च्युन रिपोर्टनुसार, ब्रायन निकोल यांना वार्षिक पगार १६ लाख डॉलर दिला आहे. त्याशिवाय ३६ लाख डॉलर ते ७२ लाख डॉलर पर्यंत परफॉर्मेंस बेस्ड इन्सेंटिव मिळू शकतो. सॅलरी आणि इन्सेंटिव हा त्यांच्या पॅकेजचा पार्ट आहे.  मात्र, वार्षिक अनुदान त्या पॅकेजपेक्षा वेगळे असते. त्यांच्या ऑफर लेटरमध्ये यूनिक अकोमोडेशनचाही उल्लेख आहे. ते स्टारबक्सच्या सिएटल मुख्यालयात शिफ्ट होणार नाहीत. मात्र आवश्यकतेनुसार ये-जा करण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

अजून काय काय मिळणार ...

कंपनीने त्यांच्यासाठी कॅलिफोर्नियात एक छोटे कार्यालय उघडणार आहे. त्यांना एक कार दिली जाईल त्यासोबत खासगी वाहन चालकही असेल. सिएटलमध्ये त्यांना जे घर दिले जाईल त्याचा खर्च कंपनी करणार आहे. ब्रायन निकोल यांनी स्वतःला आमच्या उद्योगातील सर्वात प्रभावी उद्योजकांपैकी एक असल्याचे सिद्ध केलं आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ दिला आहे. स्टारबक्समधील त्यांची भरपाई थेट कंपनीच्या कामगिरीशी आणि आमच्या सर्व भागधारकांच्या सामायिक यशाशी संबंधित आहे असं स्टारबक्सचे प्रवक्ते म्हणाले आहेत. 

निकोल यांनी लक्ष्मण नरसिम्हन यांची जागा घेतली आहे. ज्यांनी १७ महिने स्टारबक्सचं नेतृत्व केले होते. या काळात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत २३.९ टक्के घट झाली होती. ज्यामुळे कंपनीला ३२ बिलियन डॉलरचं नुकसान झालं. फॉर्च्युननुसार, सध्याचे सीईओ निकोल यांच्या चिपोटल मॅक्सिकन फास्ट फूड कंपनीने शानदार कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात कंपनीचे शेअर किंमत ८०० टक्क्यांनी वाढले. त्याशिवाय ७ पटीने कंपनीला फायदा झाला. त्यामुळे स्टारबक्सनं या पॅकेजमध्ये ब्रायन निकोल यांना हायर केले आहे.

 

टॅग्स :व्यवसाय