दिग्गज कॉफी कंपनी स्टारबक्सनं भारतीय वंशाच्या लक्ष्मण नरसिह्मन यांची कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ते कंपनीचे विद्यमान सीईओ हॉवर्ड शुल्स यांची जागा घेतील. १ ऑक्टोबर रोजी लंडन येथून सिएटल स्थानांतरीत झाल्यानंतर ते स्टारबक्समध्ये सहभागी होतील. दरम्यान, कंपनी त्यांना तब्बल १४० कोटी रूपयांचं वार्षिक वेतन देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
द गार्डियनच्या रिपोर्टनुसार कंपनी त्यांना मोठं वेतन देणार आहे. त्यांना वार्षिक ११७.५ मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रूपयांमध्ये १४० कोटी रूपयांच वेतन मिळणार असल्याचं आऊटलेटनं म्हटलंय. त्यांना रेकिट बेंकिसरमध्ये वार्षिक ६ दशलक्ष पौड म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये ५५ कोटी रूपयांचं वेतन मिळत आहे.
कंपनीच्या अनेक गोष्टींमध्ये सकारात्मरक बदल करण्याची जबाबदारी लक्ष्मण नरसिह्मन यांच्या खांद्यावर असेल. रेकिट बेंकिसरचं मूल्य ४५ बिलियन पौंड आहे, तर दुसरीकडे स्टारबक्सचा उत्पन्न जवळपास ८७ बिलियन पौंड असल्याचं गार्डियनच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. यामुळेच नरसिह्मन यांना मिळणारे इन्सेटिव्ह्सही अधिक असतील.
अनेक महत्त्वाच्या भूमिकायापूर्वी नरसिह्मन यांनी पेप्सिकोमध्येही अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. यामध्ये चीफ कमर्शिल ऑफिरसची भूमिकाही महत्त्वाची होती. त्यांनी कंपनीच्या लॅटिन अमेरिका, युरोप आणि आफ्रिका व्यवसायाचे सीईओ म्हणूनही काम केलंय. त्यांनी कन्सल्टिंग फर्म मॅकिन्से अँड कंपनीमध्ये सीनिअर पार्टनर म्हणूनही काम केलंय. याठिकाणी त्यांनी अमेरिका, आशिया आणि भारतात आपले ग्राहक, टेक्नॉलॉजी प्रॅक्टिसवर लक्ष केंद्रित केलं होतं.