Join us  

हेड ऑफिस १६०० किमी लांब, प्रायव्हेट जेटने 'ते' ऑफिसला जाणार; Starbucks च्या सीईओचा 'नादखुळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:24 AM

Starbucks CEO : स्टारबक्सचे नवे सीईओ ब्रायन निकोल खासगी जेटनं कार्यालयात जाणार आहेत. त्यासाठी ते आपल्या घरापासून सुमारे १६०० किलोमीटरचा प्रवास करतील. कंपनीच्या नियमानुसार त्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफिसमध्ये यावं लागतं.

Starbucks CEO : तुम्ही जॉब करत असाल तर तुमचं ऑफिस घरापासून किती अंतरावर आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुमचं उत्तर काय असेल? १० किलोमीटर? १५ किलोमीटर? २० किलोमीटर? किंवा त्याहून अधिक? कल्पना करा, जर तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि ऑफिस १६०० किमी दूर चेन्नईत असेल, तर तुम्ही रोज ऑफिसला कसे जाल? साहजिकच नोकरीनिमित्त तुम्ही चेन्नईतच राहाल. दिल्ली ते चेन्नई प्रवास कसा शक्य होईल. पण स्टारबक्सचे नवे सीईओ ब्रायन निकोल यांनी ही बाब शक्य केली आहे. ब्रायन आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत १६०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. त्यासाठी ते कॉर्पोरेट जेटचा वापर करणार असून या प्रवासाचा खर्च कंपनीच करणार आहे.

हवाई अंतर १६०० किलोमीटर

ब्रायन यांचं घर कॅलिफोर्नियातील न्यूपोर्ट येथे आहे. स्टारबक्सचं मुख्यालय सिएटल, वॉशिंग्टन येथे आहे. दोन्ही शहरांमधील हवाई अंतर हे सुमारे १६०० किलोमीटर. ब्रायन कंपनीच्या कामानिमित्त इतर शहरं आणि देशांमध्येही जाणार आहे. ही ट्रिप कंपनीच्या खर्चानं केली जाईल. त्याचबरोबर ब्रायन जेव्हा कंपनीच्या कामावरून कुठेही जाणार नाहीत, तेव्हा त्यांना ऑफिसमध्ये यावं लागेल. कंपनीच्या हायब्रीड पॉलिसीनुसार ब्रायन यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमध्ये यावं लागणारे. सीईओपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ब्रायन अद्याप कार्यालयात रुजू झालेले नाहीत. पुढील महिन्यापासून ते पदभार स्वीकारतील.

ब्रायन यांचं मुख्य कार्यालय आणि त्यांचा बहुतांश वेळ स्टारबक्स सिएटल सपोर्ट सेंटरमध्ये किंवा पार्टनर्सकडे भेट देणं आणि दुकानांतील ग्राहक, रोस्टरिज, रोस्टरिंग सुविधा आणि जगभरातील कार्यालयांमध्ये देतील. ब्रायन यांचं वेळापत्रक स्टारबक्सच्या हायब्रिड मार्गदर्शक तत्त्वं आणि कार्यस्थळाच्या अपेक्षांपेक्षा अधिक असेल, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं.

कोट्यवधींचं वेतन

५० वर्षीय ब्रायन यांना दरवर्षी कोट्यवधी रुपये पगार मिळणारे. स्टारबक्स नव्या सीईओंना जवळपास ११३ मिलियन डॉलर (९,४८,६१,५७,९०० रुपये) पगार देणार आहे. ब्रायन निकोल यांचा वार्षिक बेसिक पगार १.६ मिलियन डॉलर्स (१३.४२ कोटी रुपये) आहे. तसंच त्यांच्या कामाच्या आधारे त्यांना दरवर्षी ३.६ मिलयन डॉलर्स ते ७.२ मिलियन डॉलर्स बोनस देखील मिळेल. ही रक्कम मूळ वेतनाच्या चौपट आहे. त्याचबरोबर त्यांना कंपनीच्या शेअरमध्ये हिस्सा मिळणार आहे, जो वार्षिक २३ मिलियन डॉलर्सपर्यंत असू शकतो.

नरसिम्हन यांना हटवलं

ब्रायन यांच्या आधी स्टारबक्सच्या सीईओ पदाची जबाबदारी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन यांच्या हाती होती. खराब कामगिरीमुळे नरसिम्हन यांना कंपनीनं हटवलं होतं. नरसिम्हन यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये स्टारबक्सचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला होता. संध्याकाळी ६ नंतर आपण कधीच काम केलं नाही, असं नरसिंहन यांनी एका मुलाखतीदरम्यान कबूलही केलं होते.

टॅग्स :व्यवसाय