Join us

देशातील इंटरनेट सेवेचा चेहरामोहरा बदलणार; अब्जाधीश उद्योगपती मोठा धमाका करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 15:06 IST

स्टारलिंक कंपनी लवकरच भारतात येणार; पुढच्या वर्षी मोठा धमाका होणार

देशातील इंटरनेट सेवेचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. स्टारलिंक डिसेंबर २०२२ पर्यंत देशात २ लाख ऍक्टिव्ह टर्मिनल्ससोबत सॅटेलाईट कम्युनिकेशन (सॅटकॉम) सेवा सुरू करणार आहे. यासाठी कंपनी सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सरकारच्या परवानगीशिवाय ऍक्टिव्ह टर्मिनल्सची संख्या यापेक्षा कमी असेल. ही संख्या शून्यदेखील असू शकते, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

स्पेसएक्स ही ऍलन मस्क यांची कंपनी आहे. अंतराळ क्षेत्रात अतिशय सक्रिय असलेली कंपनी स्टारलिंकच्या माध्यमातून सॅटेलाईट कम्युनिकेशन सेवा देते. स्टारलिंक इंडियाचे संचालक संजय भार्गव यांनी आजच लिंक्डइनवर अक पोस्ट लिहिली. 'डिसेंबर २०२२ पर्यंत भारतात २ लाख ऍक्टिव्ह टर्मिनल्स तयार होतील. जर आम्हाला सरकारकडून मंजुरी मिळाली नाही, तर ही संख्या त्यापेक्षा खूप कमी किंवा शून्यदेखील असू शकते. हा आकडा २ लाखांच्या पुढे जाईल याची शक्यता अत्यंत कमी आहे,' असं भार्गव यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

स्टारलिंक अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. भारतात आम्हाला जास्तीत जास्त प्री-ऑर्डर मिळाल्यास सरकारी मंजुरी मिळवणं सोपं जाईल, असं भार्गव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सरकारी मंजुरीची प्रक्रिया थोडी कठीण आहे. संपूर्ण देशात सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्यास, पायलट प्रोजेक्टला लवकर परवानगी मिळावी असा आमचा प्रयत्न असेल. येत्या काही महिन्यांत मंजुरी मिळेल, अशी आशा भार्गव यांनी व्यक्त केली आहे.

संजय भार्गव यांनी बुधवारीच स्टारलिंक इंडियाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. याआधी त्यांनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्यासोबत इलेक्ट्रॉनिक कंपनी Paypal मध्ये काम केलं आहे. ते Paypal टीमच्या संस्थापकांपैकी एक आहेत.  

टॅग्स :टेस्लाइंटरनेट