- चंद्रकांत दडस (उपसंपादक)
जर तुम्हाला एखाद्या सरकारी संस्थेशी जोडून व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. यात तुम्हाला मोठ्या कमाईची संधीही असते. तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी उघडू शकता. देशातील अनेक भागात पोस्ट ऑफिस अजूनही उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन फ्रँचायझी दिली जाते.
कशी मिळते फ्रँचायझी? पोस्ट ऑफिसकडून दोन प्रकारच्या फ्रँचायझी दिल्या जातात. यामध्ये, पहिली फ्रँचायझी आउटलेटची आहे आणि दुसरी पोस्टल एजंट्सची आहे. तुम्ही यापैकी कोणतीही फ्रँचायझी घेऊ शकता. याशिवाय शहरी आणि ग्रामीण भागात घरोघरी पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरी पोहोचवणारे एजंट आहेत. याला पोस्टल एजंट फ्रँचायझी म्हणून ओळखले जाते. पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजनेअंतर्गत, कोणतीही व्यक्ती थोडी रक्कम जमा करून पोस्ट ऑफिस उघडू शकते.
कुणाला मिळेल? फ्रँचायझीसाठी व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. कुटुंबातील कोणताही सदस्य पोस्ट खात्यात नसावा. ८वी उत्तीर्ण असावे. फ्रँचायझीसाठी तुम्हाला फॉर्म भरून अर्ज करावा लागेल. यानंतर, निवड झाल्यावर, इंडिया पोस्टसोबत सामंजस्य करार करावा लागेल.
ऑफिस एरिया किती असावा? फ्रँचायझी आउटलेटसाठी गुंतवणूक कमी लागते. पोस्टल एजंटसाठी अधिक गुंतवणूक करावी लागते कारण स्टेशनरी वस्तूंच्या खरेदीत जास्त पैसा खर्च होतो. पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी किमान २०० स्क्वेअर फूट ऑफिस एरिया आवश्यक आहे.
सुरक्षा रक्कम किती? फ्रँचायझी उघडण्यासाठी किमान सुरक्षा रक्कम ५००० रुपये आहे. प्रथम पोस्ट ऑफिस फ्रँचायझीसाठी अर्ज करावा लागेल. कमाईबद्दल बोलायचे झाले तर वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे कमिशन मिळते.