मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेली जोरदार खरेदी यामुळे मुंबई शेअर बाजारामध्ये तेजी परतली आहे. बाजारात नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ जोरदार तेजीने झाल्याने सेन्सेक्स पुन्हा ५० हजारांच्या पार गेला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही १४,९०० अंशांच्या जवळ आला आहे.
गुरुवारी सकाळपासूनच बाजार तेजीमध्ये होता. बाजारात गुंतवणूकदारांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसअखेरीस बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५२.०६ अंश म्हणजेच १.०५ टक्क्यांनी वाढून ५०,०२९.८३ अंशांवर बंद झाला. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने ५० हजार अंशांचा टप्पा पार केल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर्स हे वाढीव पातळीवर बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचानिर्देशांका(निफ्टी)मध्येही चांगली वाढ झालेली दिसून आली. हा निर्देशांक १७६.६५ अंशांनी म्हणजेच १.२ टक्क्यांनी वाढून १४,८६७.३५ अंशांवर बंद झाला. अन्य क्षेत्रीय निर्देशांकांनीदेखील वाढ नोंदविली. बँका, वित्तीय कंपन्या तसेच सिमेंटच्या कंपन्या व औषध कंपन्यांना मोठी मागणी असलेली दिसून आली.
अमेरिकेने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जाहीर केलेल्या योजनेमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच सर्वत्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण या बाबीला दुय्यम स्थान देऊन मोठी खरेदी केली गेली. शुक्रवारी बाजाराला गुड फ्रायडेची सुटी असल्याने व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे गुरुवारीच बाजारात सप्ताहाचा समारोप झाला आहे.
शेअर बाजारात नवीन वर्षाचा प्रारंभ तेजीने, सेन्सेक्स बनला पुन्हा ५० हजारी
stock market : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेली जोरदार खरेदी यामुळे मुंबई शेअर बाजारामध्ये तेजी परतली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:04+5:302021-04-02T04:11:25+5:30