नवी दिल्ली : कायदेशीर प्रकरणांची प्रदीर्घ प्रक्रिया कमी करण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी आयकर विभागाने ‘पॅन’ आधारित आॅनलाईन प्रणाली सुरू केली आहे. आयकर अधिकारी या प्रणालीद्वारे आपल्या अधिकार क्षेत्रातील येणारी प्रकरणे त्वरित पाहू शकतील.
आयकर विभागाने या प्रणालीमधून ५ लाख अपील आणि १.५० लाख निवाड्यांचा डेटाबेस तयार केला आहे. ही नवीन सुविधा राष्ट्रीय न्यायिक संदर्भ प्रणालीचा (एन.जे.आर.एस.) भाग आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. हा अधिकारी म्हणाला की, एन.जे.आर.एस.मध्ये एक नवीन लिंक अलीकडेच जोडण्यात आली आहे. त्याद्वारे आकलन अधिकारी (एओ) व त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारी प्रकरणे त्वरित पाहू शकतील. केवळ ‘पॅन’ क्रमांकाच्या आधारे ते संबंधित अपिलापर्यंत जाऊ शकतात. या नवीन प्रणालीमुळे विभागात खटला व्यवस्थापनात लागणारा वेळ कमी लागेल. देशातील जास्तीत जास्त करदात्यांनी आणि लोकांनी पॅन कार्डाचा वापर करावा यासाठी कर विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. पॅन वापरणाऱ्या व्यवसायविषयक सर्व आर्थिक व्यवहारांचा शोध लावण्यासाठी विभागाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याद्वारे व्यक्तिगत आणि सामूहिक व्यवहारांची माहिती मिळू शकेल. एन.जे.आर.एस.शी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वच करदात्यांना ही प्रणाली भविष्यात उपलब्ध होईल. त्याद्वारे ते त्यांच्या अपिलाचे काय झाले हे पाहू शकतील. सरकारी आकडेवारीनुसार आयकर विभागाने ५ लाख अपील आणि १.५ लाख निवाड्याचा डेटाबेस तयार केला आहे. त्यात उत्तरोत्तर सुधारणा करण्यात येत असून, ही आकडेवारी बदलत आहे.
करदात्यांना व रिटर्न भरणाऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयकर विभागाने अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यात आणखी ही नवीन भर पडली आहे.
पॅन आधारित विवाद व्यवस्थापन प्रणाली सुरू
कायदेशीर प्रकरणांची प्रदीर्घ प्रक्रिया कमी करण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी आयकर विभागाने ‘पॅन’ आधारित आॅनलाईन प्रणाली सुरू केली आहे.
By admin | Published: November 25, 2015 11:22 PM2015-11-25T23:22:56+5:302015-11-25T23:22:56+5:30