Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन महत्त्वाकांक्षी सुवर्ण योजना सुरू

तीन महत्त्वाकांक्षी सुवर्ण योजना सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या ऐन तोंडावर सुवर्ण बचत ठेव, सुवर्ण रोखे, सुवर्ण नाणे आणि बुलियन अशा तीन सुवर्णमय योजनांचा शुभारंभ करून महिलांसह

By admin | Published: November 6, 2015 12:51 AM2015-11-06T00:51:54+5:302015-11-06T00:51:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या ऐन तोंडावर सुवर्ण बचत ठेव, सुवर्ण रोखे, सुवर्ण नाणे आणि बुलियन अशा तीन सुवर्णमय योजनांचा शुभारंभ करून महिलांसह

Starting three ambitious gold schemes | तीन महत्त्वाकांक्षी सुवर्ण योजना सुरू

तीन महत्त्वाकांक्षी सुवर्ण योजना सुरू

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या ऐन तोंडावर सुवर्ण बचत ठेव, सुवर्ण रोखे, सुवर्ण नाणे आणि बुलियन अशा तीन सुवर्णमय योजनांचा शुभारंभ करून महिलांसह तमाम जनतेला आर्थिक समृद्धीसोबत आर्थिक सुरक्षा प्रदान केली.
घराघरात आणि मंदिरात पडून असलेले जवळपास ५२ लाख कोटी रुपये किमतीचे बिनकामी २० हजार टन सोने बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणून सोने आयातीला आळा घालण्याच्या इराद्यातहत सुवर्ण बचत ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. यासोबत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘अशोक चक्र’ आणि महात्मा गांधी यांचे चित्र अंकित असलेले सुवर्ण नाणेही जारी करण्यात आले. या योजनांचा ानतेने लाभ घेऊन राष्ट्राच्या उभारणीला हातभार लावावा, असे आवाहनही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी
केले.
‘सोन्याहून पिवळे’ (सोने पे सुहागा) अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी या तीन सुवर्ण योजनांचे वर्णन केले. सरकारने पहिल्यांदाच भारतीय सुवर्ण नाणे जारी केल्याने भारतीयांना आता विदेशी टाकसाळीत पाडण्यात आलेल्या सुवर्ण नाण्यांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. या सुवर्ण नाण्यांमुळे ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेलाही बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बचत करण्याची भारतीय परंपरा आणि सोन्याच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याच्या भारतीय संस्कृतीचा उल्लेख करताना ते विनोदाने म्हणाले की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना अर्थशास्त्र आणि गृहशास्त्र यातील फरक समजून घ्यावा लागेल.
यावेळी वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले की, सोन्याच्या आयातीला आळा घालणे जरूरी आहे. सुवर्ण रोखे योजनेमुळे सोन्याची मागणी कमी होईल. लोकांकडे पडून असलेले सोने व्यक्तिगत बचत असू शकते; परंतु त्यातून देशाच्या विकासाला मदत होऊ शकत नाही. या तीनही सुवर्ण योजनांचा लोकांनी जरूर फायदा घ्यावा.
सुवर्ण बचत ठेव योजनेतहत बँका १५ वर्षे सोने ठेवून घेतील. वेळोवेळी लिलाव करतील किंवा सराफा व्यावसायिकांना उधारीवर देतील. या योजनेतहत बँक सोने ठेवणाऱ्या ठेवीदारांना वार्षिक २.५० टक्के दराने कमाईही करता येईल. हा दर बँकेतील ठेवीसाठीच्या दरापेक्षा कमी आहे. घरात बिनकामी पडून असलेले सोने बँकेत ठेव म्हणून ठेवता येईल. याची मुदत १ ते ३ वर्षे, ५ ते ७ वर्षे किंवा १२ ते १५ वर्षे असेल. यावर, लघु-मध्यम अवधीसाठी २.२५ टक्के वार्षिक व्याज मिळेल. या योजनेतहत कमीत कमी ३० ग्रॅम सोने जमा करावे लागेल.

अशी आहे सुवर्ण रोखे योजना...
सुवर्ण रोखे भारतीय नागरिक, हिंदू संयुक्त कुटुंब, विश्वस्त आणि धर्मादाय संस्था खरेदी करू शकतात. हे रोखे बँका, पोस्ट आॅफिसच्या माध्यमातून विकले जातील. सुवर्ण रोखे खरेदी करण्यासाठी केवायसीची पूर्तता करावी लागेल. यासाठी मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एक द्यावे लागेल.
सुवर्ण रोखे खरेदीसाठी ५ ते २० नोव्हेंबर दरम्यान अर्ज स्वीकारले जातील. २६ नोव्हेंबर रोजी रोखे जारी केले जातील. रोख्यांची मुदत ८ वर्षे असेल. तसेच पाच वर्षात मोडण्याचाही पर्याय असेल. तथापि, मुदतीआधी काढल्यास व्याज निश्चित करण्याचा अधिकार बँकांना असेल. सुवर्ण रोखे प्रति ग्रॅम २,६८४ रुपये या प्रमाणे खरेदी करता येतील.
मोदी यांनी जारी केलेल्या सोन्याच्या नाण्यावर एका बाजूस अशोक चक्र आणि दुसऱ्या बाजूस महात्मा गांधी यांच्या प्रतिमा आहेत. सुरूवातीला ५ आणि १0 ग्रॅम सोन्याची नाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नंतर २0 ग्रॅमची नाणी उपलब्ध होतील. देशभरातील १२५ दुकानांत ही नाणी आणि सॉवरिन उपलब्ध असतील,असे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Starting three ambitious gold schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.