नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमचेही या सरकारी बँकेत खाते असल्यास आणि तुम्ही एटीएमद्वारे (ATM) पैसे काढत असाल तर आतापासून तुम्हाला पैसे काढण्यासाठी विशेष नंबरची आवश्यकता असणार आहे.
आता तुम्हाला एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी (OTP) टाकावा लागेल. त्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल. दरम्यान, देशभरात फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी बँकेने ही सुविधा सुरू केली आहे.
1 जानेवारीपासून सुविधा सुरू
ग्राहकांचे एटीएम व्यवहार सुरक्षित करण्यासाठी बँकेने 1 जानेवारी 2020 पासून ओटीपी आधारित व्यवहार सुरू केले आहेत. ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत हा या सुविधेचा मुख्य उद्देश आहे.
बँकेने केले ट्विट
एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवर म्हटले आहे की, एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी ओटीपी आधारित रोख काढण्याची प्रणाली ही फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध लसीकरण आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.
Our OTP based cash withdrawal system for transactions at SBI ATMs is vaccination against fraudsters. Protecting you from frauds will always be our topmost priority.#ATM#OTP#SafeWithSBI#TransactSafely#SBIATM#Withdrawal#AmritMahotsav#AzadiKaAmritMahotsavWithSBIpic.twitter.com/g5P50lFhLw
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 9, 2022
कशी काम करते ही सुविधा?
- नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसबीआय ग्राहकांना एक ओटीपी पाठवला जाईल.
- हा ओटीपी टाकून ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकतील
- ओटीपी हा चार अंकी नंबर असेल, जो एकदाच व्यवहार करू शकेल.
- हे कार्डधारकांना अनधिकृत एटीएममधून पैसे काढण्यापासून वाचवेल.
ओटीपी टाकावा लागेल
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ज्यावेळी तुम्ही एटीएम मशिनमधून पैसे काढता, त्यावेळी करावा लागेल. एटीएम मशिनमधून पैसे काढताना तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाकावा लागेल, त्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल.
बँक वेळोवेळी करते अलर्ट
सध्या फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यांना रोखण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. याशिवाय, ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी बँक वेळोवेळी ट्विट आणि मेसेज पाठवून अलर्ट करत असते.
ओटीपीची गरज कधी भासेल?
दरम्यान, जर तुम्ही एटीएममधून 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक पैसे काढले तरच तुम्हाला ओटीपी लागेल. यापेक्षा कमी रक्कम काढण्यासाठी तुम्हाला ओटीपीची गरज लागणार नाही.