३० आणि ३१ जानेवारी रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँक शाखेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) म्हटले आहे की, ३०-३१ जानेवारी रोजी युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सने पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे त्यांच्या शाखेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपात देशभरातील बँक शाखा कर्मचारी सहभागी होणार आहेत. दरम्यान, ग्राहकांनी यापूर्वीच आपले काम पूर्ण केले तर समस्या टळू शकतात.
SBI चे देशभरात ४२ कोटी पेक्षा जास्त खातेधारक आहेत. अशा परिस्थितीत बँकेने आपल्या ग्राहकांना आवाहन केले आहे की, संपापूर्वी म्हणजेच २७ जानेवारीपर्यंत ग्राहकांनी आपली सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करावीत. २८ जानेवारीला चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहणार आहे, त्यानंतर २९ तारखेला रविवारची सुट्टी आहे. संपूर्ण ४ दिवस बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कामकाजावर होणार परिणाम
SBI ने सांगितले की, आम्हाला इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) कळवले आहे की युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने UFBU शी संबंधित संघटनांना म्हणजे AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA इत्यादींना संपाची नोटीस जारी केली आहे. SBI ने स्टॉक एक्सचेंजला कळवले की AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF आणि INBOC यांनी त्यांच्या मागण्यांसाठी ३० आणि ३१ जानेवारी २०२३ रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याचा प्रस्ताव दिला आहे.
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने शाखेच्या सामान्य कामकाजासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. तथापि, बँकांनी ग्राहकांना असेही सांगितले आहे की, संपामुळे ३० आणि ३१ जानेवारी रोजी शाखांचे कामकाज प्रभावित होऊ शकते.
‘या’ आहेत ५ मागण्या
एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा सुरू करण्यासाठी ३० आणि ३१ जानेवारी रोजी संपाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांच्या ५ मागण्या आहेत. प्रथम बँकिंग, निवृत्ती वेतन अद्ययावत करावे, अनेक जुने प्रश्न, नॅशनल पेन्शन प्रणाली रद्द करण्यात यावी, पगारात सुधारणा करून सर्व संवर्गात भरती करण्यात यावी.