Join us  

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँक देशातील अनेक शहरांमध्ये ३०० शाखा उघडणार, जाणून घ्या काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 1:25 PM

सध्या एसबीआयच्या (SBI) देशभरात २२,४०५ शाखा आहेत आणि परदेशात २३५ शाखा आहेत.

नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (State Bank of India) आपल्या ग्राहकांना एक खुशखबर देण्याची तयारी करत आहे. बँक देशाच्या विविध भागांमध्ये ३०० नवीन शाखा उघडण्याचा विचार करत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या सर्व शाखा या आर्थिक वर्षात उघडल्या जातील. दरम्यान, सध्या एसबीआयच्या (SBI) देशभरात २२,४०५ शाखा आहेत आणि परदेशात २३५ शाखा आहेत. नवीन शाखा सुरू झाल्यानंतर एसबीआयच्या देशांतर्गत शाखांची संख्या २३,००० च्या पुढे जाईल.

पीटीआयच्या वृत्तानुसार, विश्लेषकांशी बोलताना एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा (SBI Chairman Dinesh Khara) यांनी माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही आमच्या बँकेचा व्यवसाय डिजिटल पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. यासोबतच बँकेच्या शाखांची संख्या वाढवण्यासाठी एसबीआय यावर्षी ३०० हून अधिक नवीन शाखा उघडू शकते. शाखा उघडताना बँक कोणत्या शाखेची सर्वात जास्त गरज आहे, हे लक्षात ठेवेल. त्याआधारे शाखेची जागाही ठरवली जाणार आहे. तसेच एसबीआय ग्राहकांच्या गरजा समजून घेत असून त्यांच्या गरजेनुसार आम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे दिनेश खारा यांनी सांगितले.

बँक स्वत:च्या धोरणावर काम करत आहे आणि सध्याच्या फ्रँचायझींसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे, असे याबाबतची माहिती देताना एसबीआयचे रिटेल बिझनेस आणि ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक आलोक कुमार चौधरी यांनी सांगितले. तर निव्वळ व्याज मार्जिनची माहिती देताना एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात तो ३.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. बँकेला आशा आहे की, आम्ही ते ३.४७ टक्क्यांपर्यंत ठेवू शकतो. दरम्यान, बँकेच्या तिमाही निकालांबद्दल बोलायचे झाल्यास, चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत बँकेने १६,८८४ कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे. यासोबतच बँकेच्या एनपीएमध्येही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत बँकेचा नफा ६,०६८ कोटी रुपये होता.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएसबीआय