देशभरातील करोडो नागरिकांचा उदरनिर्वाह हा फिक्स डिपॉझिटवरील (FD) व्याजावर चालतो. मात्र, बुधवारी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने एक ते दोन वर्षे मुदतीच्या एफडीवरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. यामुळे अन्य बँकाही हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर सर्वाधिक होणार असून त्यांच्यापुढे समस्या उभी ठाकली आहे.
रिझर्व्ह बँकेने बँकाना आदेश देत म्हटले होते की, बँकांनी व्याजदरांना एमसीएलआरला नाही तर रेपो दराशी जोडावे. रेपो रेट सातत्याने बदलत असतो. यामुळे जमा असलेल्या रक्कमेचे व्याजही बदलत राहणार आहे. एसबीआयने व्याजदर कपात केल्याने 50 लाख रुपयांच्या एफडीवर वर्षाला 5000 रुपयांचे नुकसान होणार आहे. एसबीआयनुसार 4.1 कोटी ज्येष्ठ नागरिकांचे एफडी खात्यांमध्ये 14 लाख कोटी रुपये आहेत.
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील आहे. यामुळे रेपो रेट कमी केला जात आहे. 4 ऑक्टोबरला हा दर कमी करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यांतील ही सहावी वेळ होती. यामुळे जमा रकमेवरील व्याजामध्येही सहावेळा घट झाली आहे. जे व्यक्ती या व्याजावर अवलंबून होते त्यांना मोठा फटका बसणार आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकार करामध्ये कपात करू शकते.
एसबीआयने काय केले?
एसबीआयने कमी अवधीच्या कमी रकमेच्या एफडीवर व्याज कमी केले आहे. 0.10 टक्क्यांनी घटविले आहे. तर जास्त रकमेच्या एफडीवर 0.30 टक्क्यांनी घट केली आहे. तसेच बचत खात्यामध्ये 1 लाख रुपये ठेवणाऱ्यांच्या व्याजामध्ये 3.50 वरून 3.25 एवढी कपात केली आहे.