Join us  

 स्टार्टअप्समध्ये राज्याची भरारी, मुंबईत सर्वाधिक, देशात १८ टक्के वाटा

By सीमा महांगडे | Published: January 16, 2023 7:49 AM

सद्यःस्थितीत भारतात सुमारे २,४४,००० स्टार्टअप्सची नोंद

सीमा महांगडे 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरोनाकाळात अनेक क्षेत्रांनी माना टाकल्या, तर अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मात्र, हाच संकटकाळ स्टार्टअप्ससाठी इष्टापत्ती ठरला. अनेक स्टार्टअप्सची नोंद या काळात झाली. देशात एकूण ८८ हजार १३६ स्टार्टअप्स असून, त्यापैकी सर्वाधिक १६ हजार २५० स्टार्टअप्स एकट्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजेच एकूण स्टार्टअप्सपैकी १८ टक्के स्टार्ट अप्स महाराष्ट्रात आहेत.

सद्यःस्थितीत भारतात सुमारे २,४४,००० स्टार्टअप्सची नोंद आहे. यातील ८८,१३६ स्टार्टअप्स उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) तर्फे मान्यता प्राप्त आहेत.  स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील विविध राज्यस्तरावरही अनेक धोरणे, योजना राबवल्या जात आहेत.

राज्यातील चित्र...

 एकूण स्टार्टअप्स : १६,२५१

कुठे किती?

- मुंबई शहर - ४,६९२- मुंबई उपनगर - १,१९५- पुणे -४,५३६ - नागपूर- ७३३- नाशिक -१,५८३- औरंगाबाद -१,०४७ - सिंधुदुर्ग-१९- गडचिरोली : १२ - नंदुरबार : २०

राज्य सरकारचे उपयुक्त उपक्रम

- महाराष्ट्र स्टार्टअप वीक- इनक्यूबेटर्सची स्थापना- महिला उद्योजकता कक्ष- बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना- गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना- महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज- महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा- महाराष्ट्र व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटर- स्टार्टअप फंड 

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचा पाठिंबा

महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबंधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप वीक, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थ सहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थ सहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर व सीड फंड यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.

देशातील १०८ युनिकॉर्न स्टार्टअप्सपैकी २५  युनिकॉर्नस् महाराष्ट्रातील आहेत. हे प्रमाण २३ टक्के आहे. (युनिकॉर्न म्हणजे  ८००० कोटी रुपयांचे मूल्य असलेली कंपनी)

टॅग्स :व्यवसाय