MTNL News: सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. दरम्यान, एमटीएनएलनंबँकेचं ८,३४६.२४ कोटी रुपयांचं कर्ज थकवलं आहे. कंपनीनं ७ सरकारी बँकांकडून हे कर्ज घेतलं होतं. कंपनीनं रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. तोट्यात चाललेल्या या सरकारी टेलिकॉम कंपनीचं एकूण कर्ज ३१ मार्च २०२५ पर्यंत ३३,५६८ कोटी रुपये होतं. शनिवारी रेग्युलेटरी फाइलिंगमधून ही माहिती मिळाली.
या बँकांकडून घेण्यात आलेलं कर्ज
युनियन बँक ऑफ इंडिया (३,६३३.४२ कोटी रुपये), इंडियन ओव्हरसीज बँक (२,३७४.४९ कोटी रुपये), बँक ऑफ इंडिया (१,०७७.३४ कोटी रुपये), पंजाब नॅशनल बँक (४६४.२६ कोटी रुपये), एसबीआय (३५०.०५ कोटी रुपये), युको बँक (२६६.३० कोटी रुपये) तसंच मुद्दल आणि व्याज देयकं (१८०.३ कोटी रुपये) यांचा समावेश आहे. ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कर्जाची परतफेड करण्यात कंपनी डिफॉल्ट झाली.
कर्जात ही रक्कम समाविष्ट
कंपनीवरील एकूण थकीत कर्जामध्ये बँकेचं ८,३४६ कोटी रुपयांचे कर्ज, २४,०७१ कोटी रुपयांची सॉव्हरेन गॅरंटी (एसजी) आणि एसजी बाँड्सचं व्याज देण्यासाठी दूरसंचार विभागाकडून १,१५१ कोटी रुपयांचं कर्ज यांचा यात समावेश आहे.
स्टॉक स्टेटस
महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे (MTNL) शेअर्स गेल्या आठवड्यात घसरणीसह बंद झाले. बीएसईवर कंपनीचा शेअर ०.१६ टक्क्यांनी म्हणजेच ०.०७ रुपयांनी घसरून ४३.८५ रुपयांवर बंद झाला. या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर १०१.८८ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३२.७० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २,७६२.५५ कोटी रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)